नाशिक : दिंडोरीत जिवा पांडू गावितांच्या माघारीबाबत संदिग्धता | पुढारी

नाशिक : दिंडोरीत जिवा पांडू गावितांच्या माघारीबाबत संदिग्धता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपाने माघार घेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. पण मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेले माकपाचे अधिकृत उमेदवार जे. पी. गावित हे सोमवारी (दि.६) अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे. त्यामुळे माघारीवरून अद्याप तरी संदिग्धता आहे.

लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघाच्या उमेदवारी माघारीसाठी अवघे काही तास उरले असतानाच नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. या मतदारसंघातून माकपाने आघाडी धर्म पाळताना रविवारी (दि. ५) मविआचे उमेदवार भगरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पण, माकपाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या गावितांनी कार्यकर्ते व समर्थकांचा मेळावा घेतला. त्यानंतर सोमवारी अधिकृत भूमिका घोषित करू, अशी भूमिका घेतली आहे. वास्तविक मविआच्या जागा वाटपात माकपाने दिंडोरीवर दावा सांगितला होता. परंतु, सदरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटल्याने माकपाचे गावित नाराज होते.

दिंडोरी मतदारसंघामधून महाविकास आघाडीकडून भगरे हे रिंगणात आहेत. तर गावित यांनीही निवडणुकीत पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आघाडीसमोर पेच निर्माण झाला. दरम्यानच्या काळात आघाडीच्या नेत्यांनी गावितांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात नेत्यांना यश आले नाही. दोन दिवसांपूर्वी जळगाव येथे खा. शरद पवार यांची गावितांनी भेट घेतली. नाशिकमधील आघाडीचे नेतेदेखील यावेळी उपस्थित होते. या भेटीत पवारांनी गावितांची मनधरणी केली. त्यानंतर माकपाने निवडणुकीतून माघारीची घोषणा केली. परंतु, गावितांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात असल्याने माघारीची सस्पेन्स कायम आहे.

सोशल माध्यमातून माझ्या माघारीबाबत वृत्त येत आहेत. पण हे वृत्त खोडसाळ असून, ते चुकीचे आहे. कार्यकर्ते व समथर्कांची आज बैठक घेतली आहे. माझी अधिकृत भूमिका सोमवारी (दि. ६) दुपारी दोन वाजता घोषित केली जाईल. – जे. पी. गावित, उमेदवार, माकपा, दिंडोरी.

Back to top button