पिंपळनेर : रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीला जातो तेव्हा…. | पुढारी

पिंपळनेर : रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीला जातो तेव्हा....

पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील इंदवे येथील स्वस्त भाव दुकानातून सुमारे ५० किलो तांदूळ १४०० रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे खरेदी करून घरी नेत असतांना एका इसमास गावकऱ्यांनी पकडल्याने रेशन दुकानातील काळा धंदा पुन्हा एकदा उजेडात आला आहे. गरिबांसाठी असलेला तांदूळ लाभार्थींना न देता रेशन दुकानदार काळ्या बाजारात विकत असल्याचे खुलेआम उघड झाल्याने गावकऱ्यांमधून संताप व्यक्त होतो आहे. मात्र अशा घटना वारंवार घडूनही प्रशासन या घटनांकडे गांभीर्याने पाहत नसल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

मंगळवार (दि.९) रात्री ८:३० वाजेच्या सुमारास रास्त भाव धान्य दुकान परवाना क्रमांक ८१ चे दुकानदार चिंदाबाई गजमल सोनवणे (रा. इंदवे, ता.साक्री) यांचा मुलगा अनिल देवरे हे रेशन दुकानातील ५० किलो तांदळाची १ गोणी किंमत ७०० रुपये दराने विक्री करत असताना रवींद्र नाना देवरे यांना आढळून आले. त्यानुसार त्यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर साक्री येथील नायब तहसीलदार गोपाळ पाटील, पुरवठा निरीक्षक राकेश साळुंखे, तलाठी पी. आर.पाटील, कोतवाल किरण पवार यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी करत पंचनामा केला. यावेळी नायब तहसीलदार यांच्यासमोर रेशन दुकानदाराविरुद्ध नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले व घटनेची कसून चौकशी करण्याची मागणी केली. परंतु घटनेचा पुढील तपास जिल्हा पुरवठा अधिकारी निःपक्षपातीपणे करतील, दुकान मालक दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन नायब तहसीलदार गोपाळ पाटील यांनी दिल्याने ग्रामस्थांनी सकारात्मक न्याय मिळण्याची आशा व्यक्त केली.

हेही वाचा:

Back to top button