Lok Sabha Election 2024: देशाच्या पूर्व किनारपट्टीवर भाजपचे वादळ घोंघावणार | पुढारी

Lok Sabha Election 2024: देशाच्या पूर्व किनारपट्टीवर भाजपचे वादळ घोंघावणार

ज्ञानेश्वर बिजले

उत्तर भारतातील वर्चस्वाच्या जोरावर देशात सत्ता मिळविलेल्या भारतीय जनता पक्षाला विरोधकांचे खरे आव्हान आहे. ते देशाच्या पूर्व किनारपट्टीवर. तेथील पश्चिम बंगालपासून तमिळनाडूपर्यंतच्या राज्यात प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य आहे. या राज्यात शिरकाव करण्याची रणनीती भाजपने आता आखली आहे. ती यशस्वी ठरल्यास, त्यांना 2024 मधील सत्ता चांगल्या बहुमताने पुन्हा मिळू शकेल. Lok Sabha Election 2024

उत्तर भारतात भाजपने निर्विवाद वर्चस्व आहे. तेथील काही राज्यात त्यांची लढत मुख्यत्वे काँग्रेसशी आहे, तर बिहार, झारखंड आणि उत्तरप्रदेशात त्यांचा लढा प्रादेशिक पक्षांसोबत आहे. दक्षिण भारतात प्रादेशिक पक्षांसोबतच काँग्रेसचेही त्यांना आव्हान आहे. पूर्व किनारपट्टीवरील पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्रप्रदेश, तमिळनाडू या राज्यांमधील ताकदवान प्रादेशिक पक्षांचे राज्य सरकार आहे. या ठिकाणी गेल्या वेळेपेक्षा काही जागा वाढतात का, यादृष्टीने भाजप तयारीला लागला आहे. भाजपने गेल्या दोन निवडणुकीत न जिंकलेल्या 160 जागांवर गेल्या दीड वर्षांत लक्ष केंद्रीत केले आहे. Lok Sabha Election 2024

विरोधी पक्षांनीही एकत्र येत इंडिया आघाडीच्या माध्यमातून सत्ताधारी एनडीए आघाडीसमोर आव्हान उभारण्याचा प्रयत्न केला. त्यांचाही जोर काही राज्यात असल्याचे दिसून येते. इंडिया आघाडीतील पक्ष काही राज्यात परस्पर विरोधात असल्याने तिथे तिरंगी लढतीही रंगणार आहेत. भाजपला चारशे जागांचे लक्ष्य गाठावयाचे असल्यास, देशात विशेषतः पूर्व किनारपट्टीवरील राज्यातील राजकीय घडामोडी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणार आहेत.

Lok Sabha Election 2024 : पश्चिम बंगालमध्ये भाजप आक्रमक

भाजपने 2014 नंतर 2019 मध्ये पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रीत केले होते. तेथे त्यांनी 42 पैकी 18 जागा जिंकत राजकीय विश्लेषकांना धक्का दिला होता. भाजप दोन जागांवरून 40 टक्के मते मिळवित 18 जागांवर पोहोचले. तर तृणमूल 34 वरून 22 पर्यंत घसरले. मात्र, त्यानंतर बंगालची वाघीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी खेला होबे करीत आव्हान देत विधानसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारली.

आता लोकसभेच्या 42 जागांवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातच थेट लढत आहे. संदेशखाली प्रकरणाचा वापर भाजपने तृणमूलविरोधात प्रचारासाठी सुरू केला असून यावेळीही गेल्या वेळेपेक्षा अधिक जागा जिंकण्याची तयारी केली आहे.

इंडिया आघाडीत ममता बॅनर्जी असल्या, तरी या राज्यात त्यांच्यासोबत काँग्रेस आणि डावी आघाडी यांच्यात जागा वाटप होण्याची शक्यता खूपच कमी होती. गेल्या निवडणुकीत तृणमूलच्या विरोधातील डाव्या पक्षांची मते ही जिंकणारा स्पर्धक म्हणून भाजपकडे गेली होती. त्यामुळे, भाजपचे खासदार वाढले होते. ते लक्षात घेत तेथे इंडिया आघाडीतील पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. तिरंगी लढतीचा फायदा तृणमूल काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्यात गुप्त समझोता झाल्याचा आरोपही काहीजण करीत आहेत. मात्र, केंद्रिय संस्थांच्या कारवायांमुळे तृणमूल काँग्रेसचे नेते त्रासले आहेत. या राज्यात गेल्या वेळच्या खासदारांच्या संख्येत फारसा फरक पडण्याची शक्यता सध्यातरी दिसून येत नाही.

मुस्लीम समाजाची 30 टक्के मते, केंद्राच्या सीएए कायद्याचे परिणाम, राज्यातील सत्ताधारी पक्षाविरुद्धचे भ्रष्टाचाराचे आरोप, निवडणूक रोख्याद्वारे भाजपने जमा केलेली रक्कम अशा विविध मुद्द्यांचा वापर प्रचारात जोर धरीत आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या सातही टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे तेथील परस्परांवरील हल्ले दिवसेंदिवस अधिकाधिक धारदार होत जाण्याची शक्यता आहे.

ओरिसात बिजू जनता दलाची आघाडी

पूर्व किनारट्टीवरील दुसरे महत्त्वाचे राज्य म्हणजे बिजू जनता दलाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे ओरिसा. 77 वर्षांचे पटनाईक 2000 पासून आजपर्यंत सलग पाच निवडणुका जिंकत मुख्यमंत्री पदी आहेत. मोदी लाटेतही दोन्ही निवडणुकीत बिजू जनता दलानी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका मोठ्या मताधिक्यांनी जिंकल्या. या राज्यात गेल्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारीत 21 पैकी आठ जागा मिळविल्या. मात्र, बिजू जनता दलाचे 12 खासदार आले, तर आंध्रप्रदेश लगतचा मतदारसंघ काँग्रेसने जिंकला होता.

यावेळी तर भाजप आणि बिजू जनता दल यांच्यातच आघाडी होण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र, भाजपने लोकसभेच्या अधिक जागांची मागणी केली. त्यात बोलणी फिसकटली. पटनाईक यांनी कायम केंद्रातील सत्तेशी जुळवून घेतले, तर राज्यात लोकाभिमुख योजना राबवून मतदारांना पक्षासोबत ठेवले. यावेळीही लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकावेळी होत आहेत. यावेळी पुन्हा विधानसभा जिंकल्यास, ते देशातील सर्वांत अधिक काळ मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले नेते ठरतील.

ओरिसामध्ये इंडिया आघाडीला फारसे स्थान नाही. येथे काँग्रेसची जागा भाजपने घेतली आहे. भाजपचा एकहाती सत्ता आणण्याचा प्रयत्न आहे. मात्र, पटनाईक यांना फार दुखावण्याच्या स्थितीत ते नाहीत. योगेंद्र यादव ओरिसाबाबत म्हणाले होते, की येथील निवडणुकीचे चित्र हे पटनाईक ठरवितात. त्यामुळे, येथे भाजपच्या जागा किती वाढणार, ते पहावे लागेल.

Lok Sabha Election 2024 : आंध्रप्रदेशात एनडीएची मुसंडी

दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांत प्रादेशिक पक्षांतच जोरदार लढाई आहे. तेथे भाजप आणि काँग्रेस यांना थेट स्थान नसून, प्रादेशिक पक्षांशी आघाडी करूनच ते निवडणूक लढवितात. आंध्रप्रदेशात लोकसभेसोबत विधानसभेचीही निवडणूक आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी गेल्या निवडणुकीत बहुमत मिळविताना राज्यातील 25 जागांपैकी त्यांच्या पक्षाचे 22 खासदार निवडून आणले. यावेळी मात्र तेलगू देशमचे चंद्राबाबू नायडू यांचा बोलबाला अधिक असल्याचे त्या भागातील विविध वृत्तांवरून वाटते. नायडू यांनी भाजप आणि चित्रपट अभिनेते पवनकल्याण यांच्या पक्षाने आघाडी केली आहे. भाजपला गेल्या लोकसभा निवडणुकीत एक टक्काही मते मिळाली नव्हती. आता भाजप लोकसभेच्या सहा जागांवर, तर विधानसभेच्या दहा जागांवर लढत आहे. एनडीए आघाडीचे निम्म्यापेक्षा अधिक खासदार निवडून येतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यात भाजप हा मित्रपक्षावरच अधिक विसंबून आहे. मात्र, एनडीएचे खासदार वाढल्यास, त्याचा फायदा केंद्रात भाजपला निश्चित होईल.

मुख्यमंत्री रेड्डी यांच्या भगिनी वाय. एस. शर्मिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा झाल्या आहे. त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांच्या परंपरागत कडाप्पा मतदारसंघातून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्या कुटुंबाच्या मतदारसंघात त्यांची लढत खासदार असलेले त्यांचे चुलतभाऊ अविनाश रेड्डी यांच्याशी आहे. याच लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या एका जागेवर मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी निवडणूक लढवित आहेत. या कौटुंबिक वाद जोरदार रंग पकडत आहे. मात्र, काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची ताकद खूपच तोकडी आहे. काँग्रेस या राज्यात स्वतंत्रपणे सर्व जागांवर लढणार आहे. त्याचा फटका सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. तिरंगी लढतीचा फायदा एनडीएला होईल.

तमिळनाडूत द्रमुकचा जोर

तमिळनाडूमध्ये द्रमुकचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली असलेली आघाडी सर्वाधिक जागा जिंकण्याच्या तयारीत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांची राज्यातील 39 पैकी द्रमुकच्या आघाडीने 38 जागा जिंकल्या होत्या. यावेळीही विरोधकांतील फाटाफुटीचा फायदा त्यांना मिळेल. द्रमुक सोबतच्या आघाडीत काँग्रेस नऊ जागांवर लढत आहे.

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या अण्णाद्रमुक पक्षाचे दोन शकले झाली आहेत. त्यामुळे त्यांचा जोर कमी झाला आहे. त्यांनी भाजपची आघाडी तोडली आहे. दुसऱया बाजूला भाजपनेही प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या नेतृत्वाखाली तमिळनाडूत जोरदार तयारी केली आहे. अण्णामलाई कोईम्बतूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपच्या मतांची टक्केवारी यंदा चांगली वाढण्याची शक्यता असल्याने, तमिळनाडूत भाजप किती जागा जिंकणार, याचीच उत्सुकता आहे. दोन द्रमुक पक्षांमध्येच आत्तापर्यंत लढत होत असे. यंदा प्रथमच राष्ट्रीय पक्ष असलेला भाजप काही स्थानिक पक्षांच्या मदतीने तमिळनाडूत लढतीत उतरला आहे. त्यांची मतांची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

किनारपट्टीवरील या चार राज्यातील एकूण 127 जागांपैकी केवळ 26 जागा भाजपकडे आहेत. या चारही राज्यात काँग्रेसचा फारसा दबदबा नाही. त्यांचे अकरा खासदार आहेत. उर्वरीत 90 खासदार प्रादेशिक पक्षांचे आहेत. प्रादेशिक पक्षांचे ताकदवान मुख्यमंत्री यांनीच येथे भाजपचे आव्हान पेलले आहे.

तमिळनाडूत सर्व 39 जागांवर पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला, तर आंध्रप्रदेशातील सर्व 25 जागांवर 20 मे रोजी मतदान होणार आहे. ओरिसात शेवटच्या चार टप्प्यांत म्हणजे 13 मे ते एक जून दरम्यान मतदान होईल. पश्चिम बंगालमध्ये सर्व सातही टप्प्यात मतदान होणार आहे.

पश्चिम बंगाल आणि ओरिसात भाजप स्वबळावर, तर आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूत आघाडी करून निवडणूक लढवित आहे. भाजपने या राज्यांत त्यांच्या जागा वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपच्या या वादळाला यश मिळाल्यास, भाजपची दिल्लीतील सत्ता अधिक मजबूत होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा

Back to top button