Nashik : पाथर्डीफाटा येथील इलेक्ट्रीक वाहनाचे शोरूम आगीत खाक | पुढारी

Nashik : पाथर्डीफाटा येथील इलेक्ट्रीक वाहनाचे शोरूम आगीत खाक

सिडको : पुढारी वृत्तसेवा
पाथर्डीफाटा येथील इलेक्ट्रीक वाहनाच्या शोरूमला शनिवारी (दि.२३) पहाटे वाजेच्या सुमारास अचानक आग लागून त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज अग्निशामक दल व पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. आगीत शोरुम जवळपास खाक झाले.

अंबड येथील द गेटवे हॉटेललगत जितेंद्र इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चरचे शोरूम आहे. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास या शोरूमला आग लागली. या आगीत शोरुममधील इलेक्ट्रिक दुचाकी, इलेक्ट्रिक बॅटरी व स्पेअर पार्टसला अचानक आग लागली. यामुळे ही आग वेगाने पसरली आणि शोरुममधील गाड्या आगीने वेढल्या गेल्या. आगीत इलेक्ट्रिकल दुचाकी व बॅटरी जळून खाक झाल्या. सिडको, सातपूर, नाशिक रोड, के. के. वाघ एमआयडीसीच्या अग्निशमनच्या तीन बंबांनी आग आटोक्यात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु आग बराच वेळ धुमसत होती. या बाबत कंपनी व्यवस्थापक संदीप शांताराम बोरसे यांनी एमआयडीसी पोलीस चौकीत नोंद केली आहे. रात्री कंपनीत कुणीही कामगार नसल्याने जीवित हानी टळली. मात्र यात कंपनीचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी संजय वैरागे, केंद्रप्रमुख प्रदीप परदेशी, प्रदीप बोरसे, प्रमोद लहामगे, अग्नीशमन जवान अविनाश सोनवणे, मुकुंद सोनवणे, श्याम काळे, मुकुंद झटे आदींनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले.

Back to top button