Good News : जिल्ह्यातील ‘या’ चार कंपन्या आफ्रिकेत करणार व्यवसाय | पुढारी

Good News : जिल्ह्यातील 'या' चार कंपन्या आफ्रिकेत करणार व्यवसाय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारत व दक्षिण आफ्रिका देशांमधील करारानुसार आफ्रिकेत उद्योग स्थापन करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील कृषी क्षेत्राशी निगडीत चार कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. या कंपन्यांचे प्रतिनिधी येत्या २४ एप्रिल रोजी आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर या कंपन्या आफ्रिकन देशात व्यवसाय करणार असल्याचे ‘ओपेरिस’चे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ आशिष वेले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी ‘वेफा’चे उपाध्यक्ष तापिवा मशेंजरे, ‘ओपेरिस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गौरव धांडे, संशोधक संचालक वैशाली धांडे, पोवई मशेंजरे, प्रतीश शर्मा आदी उपस्थित होते. दक्षिण आफ्रिका व वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम फॉर एशिया (वेफा) यांच्या संयुक्त विद्यमाने आफ्रिकेत उद्योग उभारणीसाठी देशातील सौर तंत्रज्ञान, साखर उद्योग, सेंद्रिय कृषी निविष्ठा, अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान या क्षेत्रातील छोट्या कंपन्यांची निवड केली आहे. त्यासाठी ओपेरिस ॲग्रो टेक्नॉलॉजीजची मदत घेतली जात आहे. नाशिकमधील कृषी क्षेत्रातील पूर्वा केमिकल्स, कृषिदूत, ड्रीप इंडिया व जी ॲण्ड पी ॲग्रो या चार कंपन्यांची वेगवेगळ्या उत्पादनांसाठी निवड झाल्याची माहिती मान्यवरांनी दिली.

तापिवा म्हणाले, गेल्या आठ दिवसांत काही भारतीय कंपन्यांना भेट दिली. सौरऊर्जेसाठी वॉरक्राफ्ट या कंपनीची निवड केली आहे. या निवडीसाठी मोठ्या नव्हे, तर लहान क्षमतेच्या व मालकांनी शून्यातून उभारलेल्या कंपन्यांना प्राधान्य दिले जात आहे. सुमारे ८५० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांना अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. त्यांना उद्योगासाठी आफ्रिका, झिम्बाम्वे येथे जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या चार कारखान्यांपर्यंत मर्यादित असलेली ही योजना भविष्यात विविध क्षेत्रांमध्येही विस्तारित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे वेले यांनी सांगितले. डॉ. विजय म्हसदे यांनी आभार मानले.

Back to top button