ऑगस्टमधील पावसाची उणीव सप्टेंबर भरून काढणार | पुढारी

ऑगस्टमधील पावसाची उणीव सप्टेंबर भरून काढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : चालू वर्षातील सरलेला ऑगस्ट महिना 1901 नंतर सर्वाधिक तापमानाचा महिना ठरला आहे. तो संपून सप्टेंबर सुरू झाला, तरीही उकाड्यापासून दिलासा नसल्याची स्थिती आहे. सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस हे त्यामागचे कारण असल्याचेहवामान खात्यानेस्पष्ट केले आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार 4 सप्टेंबरपर्यंत देशात सरासरीपेक्षा 11 टक्क्यांनी कमी पाऊस झाला आहे. गेला ऑगस्ट महिना गेल्या शंभर वर्षांवर काळातील देशाचा सर्वात कोरडा ऑगस्ट होता, हेच त्यामागचे मुख्य कारण ठरले. ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा 36 टक्क्यांनी कमी पाऊस झाला.

सप्टेंबरकडून आशा : सप्टेंबरमध्ये मात्र ही उणीव भरून निघेल, असा दिलासा हवामान खात्याने दिला आहे. देशभरात 4 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढेल, असे खात्याने म्हटले आहे. ऑगस्टमध्ये पाऊस कमी होण्यामागे एल निनो कारणीभूत ठरल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

दिल्लीत 85 वर्षांतील सर्वाधिक उष्ण दिवस 

सोमवार (4 सप्टेंबर) हा दिल्लीतील गेल्या 85 वर्षांतील सर्वात उष्ण दिवस ठरला असून, देशाच्या राजधानीचे कमाल तापमान 40.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

सरासरीपेक्षा ते 6 अंशांनी अधिक आहे. गेल्या 85 वर्षांतील हा सर्वाधिक उष्ण दिवस ठरला आहे. याआधी 1938 मध्ये या दिवसाला सर्वाधिक तापमान नोंदविले गेले होते.

Back to top button