जलसंपदा विभागातील बदल्यांत थोडी खुशी… जादा गम | पुढारी

जलसंपदा विभागातील बदल्यांत थोडी खुशी... जादा गम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या जलसंपदा विभागातील अधिकार्‍यांच्या झालेल्या बदल्यांमध्ये ‘थोडी खुशी, जादा गम’ असल्याचे दिसून आले. उच्चस्तरीय अधिकार्‍यांबाबत तीव्र नाराजीचा सूर आहे. काही अधिकार्‍यांना मुदतवाढ हवी होती. त्यांना ती मिळाली नाही. तर काहींना ‘योग्य’ ठिकाणी बदली हवी होती. ती न मिळताच वेगळ्याच ठिकाणी बदली दिली. काहींची निवृत्ती जवळ आली असताना त्यांना राज्याच्या लांबच्या भागात बदली दिली. विशेष म्हणजे इच्छितस्थळी बदली मिळावी यासाठी काही अधिकार्‍यांनी राजकीय नेत्यांचे वजन वापरले. मात्र, त्यास केराची टोपी दाखविण्यात आली. एका अधिकार्‍यावर जलसंलदा विभाग एवढा ‘मेहेरबान’ आहे की, सात वर्षांपासून त्यास एकाच ठिकाणी मुदतवाढ मिळत आहे.

जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्यासह उपधीक्षक, उपविभागीय अभियंता यांच्यासह इतर अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश दोन दिवसांपूर्वी राज्याच्या जलसंपदा विभागाने काढले. या विभागाचे मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. बदल्या करण्यामध्ये गोपनीयता राखली होती, अशी माहिती काही अधिकार्‍यांनी नाव न छापण्याच्या अटीवर पुढारीच्या प्रतिनिधीस दिली.
अधिकार्‍यांनी इच्छित स्थळी बदली मिळावी यासाठी मंत्रालयातील कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयांचे उंबरटे झिजवले. त्यांच्याकडून पत्र घेतली. तसेच काहींनी आर्थिक देवघेव करण्याचे आश्वासन दिले. तरीही त्यामध्ये अगदीच थोड्या अधिका-यांना बदली योग्य ठिकाणी करून घेण्यात यश मिळाले. परंतु, नव्वद टक्क्यांहून अधिक अधिकार्‍यांना बदली रद्द करण्यात यश आले नाही. त्यामुळे त्यांनी बदलीच्या ठिकाणी जाणे पसंत केले. तर काही अधिकारी बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान, काही अधिकार्‍यांवर बदल्यात खैरात करण्यात आली आहे. काही अधिकारी एकाच ठिकाणी सात ते आठ वर्षांपासून ठाण मांडून बसले आहेत. त्यांना कोणताही धक्का लावला नाही. तर ज्यांना मुदतवाढ नको होती, त्यांना ती देण्यात आली आहे. जे अधिकारी वर्षभरात निवृत्त होत आहेत, त्यांची बदली राज्याच्या दुसर्‍या टोकाला करण्यात आली आहे. त्यामुळे या बदल्यांबाबत अधिकार्‍यांमध्ये नाराजी आहे.

हे ही वाचा : 

मडगाव बसस्थानकावर 3 लाखांचा गांजा जप्त; उत्तर प्रदेशमधील एकास अटक | Goa News

NIA Charge sheet : कोलकाता मध्ये दोन दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल; एनआयएची कारवाई

Back to top button