आरटीई प्रवेशाची वेबसाईट हँग ; एसएमएस न आल्याने पालक हवालदिल | पुढारी

आरटीई प्रवेशाची वेबसाईट हँग ; एसएमएस न आल्याने पालक हवालदिल

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणार्‍या 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणार्‍या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत राज्यातील 94 हजार 700 मुलांना प्रवेश जाहीर झाले आहेत. या मुलांच्या पालकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठविण्यात आले असून, त्यांना येत्या 30 एप्रिलपर्यंत प्रवेश घ्यायचे आहेत. मात्र, बुधवारी आणि गुरुवारी पालकांना एसएमएसच न आल्याने पालक हवालदिल झाले आहेत.

प्रवेश जाहीर झालेल्या मुलांच्या कागदपत्रांची पडताळणी, पालकांना गुरुवारी 13 एप्रिलपासून करता येईल. कागदपत्रांची पडताळणी करण्याची अंतिम मुदत 25 एप्रिल राहणार आहे. पालकांनी कागदपत्रांची पडताळणी करण्याचे ठिकाण पोर्टलवर लॉगईन करून कळणार आहे. पुण्यातील 936 शाळांमधील 15 हजार 655 जागांवर मुलांना प्रवेश मिळण्यासाठी 77 हजार 531 पालकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी साधारण 15 हजार 501 मुलांची प्रवेशासाठी निवड झाली आहे.

एकाचवेळी अनेकांनी वेबसाईट ओपन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे वेबसाईट स्लो झाली आहे; परंतु निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पोर्टलवर टाकण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर येत्या एक ते दोन दिवसांत वेबसाईट पूर्ववत होऊन ज्यांची निवड झाली आहे. त्या बालकांच्या पालकांना एसएमएसव्दारे किंवा संकेतस्थळावरून कळणार आहे.
                        – शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय.

 

Back to top button