वर्णनात्मक परीक्षा पद्धत २०२५ पासूनच लागू करा; स्पर्धा परीक्षा उमेदवारांची आयोगाकडे मागणी | पुढारी

वर्णनात्मक परीक्षा पद्धत २०२५ पासूनच लागू करा; स्पर्धा परीक्षा उमेदवारांची आयोगाकडे मागणी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा;  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमातील बदलांची म्हणजे परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने (स्पर्धा परीक्षा) घेण्याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे २०२३ पासून केली आहे. नवीन वर्णनात्मक पद्धतीने अभ्यासासाठी न मिळणारा वेळ, नियोजनाचा अभाव या कारणांमुळे या परीक्षेसाठी वर्णनात्मक परीक्षा पद्धती २०२५ पासून लागू करावी अशी मागणी केली आहे.

आयोगाने १ ऑगस्टला परीक्षा पद्धतीत अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. विविध शासकीय पदांसाठी गट-अ, गट-ब आणि गट-क या प्रवर्गासाठी या परीक्षा घेतल्या जातात. मात्र प्रत्येक प्रवर्गासाठी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्याने भरतीसाठी उशीर होत असल्याचे लक्षात आल्याने आता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट अ आणि गट ब संवर्गाकरिता वर्णनात्मक स्वरुपाच्या मुख्य परीक्षेच्या आधारे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा ही वैकल्पिक प्रश्नांची होती. आता ती वर्णनात्मक होणार आहे. हा निर्णय २०२३ पासून म्हणजेच पुढील वर्षापासून लागू होणार आहे. हा बदल तात्काळ होत असल्याने गेली चार ते पाच वर्ष आम्ही केलेल्या अभ्यासाचे काय, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. सात महिन्यात नव्या पद्धतीने कसा अभ्यास पूर्ण करणार असेही त्यांचे म्हणणे आहे. या नवीन अभ्यासक्रमानुसार पहिली परीक्षा ३ जून २०२३ ला, तर मुख्य परीक्षा ३० सप्टेंबर २०२३ ला होणार आहे. त्यामुळे अभ्यासक्रम बदलाचा निर्णय मान्य असला तरी तो २०२३ पासून लागू करणे अन्याकारक असून तो २०२५ पासून लागू करावा अशी मागणी होत आहे.

स्पर्धा परीक्षा : विरोध का होत आहे?

जुन्या ५ हजार मुलाखती रखडल्या आहेत. तसेच राज्यसेवा २०२२ ची तर मुख्यही झालेली नाही. त्यांच्या मुलाखती व्हायला एप्रिल-मे महिना यायचा. मग त्यांनी अभ्यास कधी आणि कसा करायचा ? नवीन पॅटर्न २०२५ ला लागू केला तर जुन्या पद्धतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या २ संधी मिळतील. ज्यांना नवीन पॅटर्ननुसार तयारी करायची आहे, ते २०२५ साठी तयारी करतील. परंतु पॅटर्न लागू करण्याची घाई झाली तर मात्र बहुतांश विद्यार्थ्यांचे नुकसान आहे.

हेही वाचा

 

Back to top button