इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा : भविष्यातील निवडणुकीत 'मिशन लोटस' मोहीम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरलेल्या भाजपच्या जोडण्या यशस्वी ठरल्या आहेत. हातकणंगले तालुक्यातील तब्बल 17 ग्रामपंचायतींचा एकहाती कारभार भाजप-मित्रपक्षांच्या हातात आल्याने याचे प्रतिबिंब आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमटू शकते. स्थानिक आघाड्यांमुळे महाविकास आघाडीची कोंडी झाल्याचे चित्र हातकणंगले तालुक्यात आहे.
राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर भाजपने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर भाजप विचारांचे उमेदवार निवडणूक आणण्यासाठी भाजपने प्रयत्न केले. त्यात त्यांना बर्यापैकी यश मिळाले. त्यामुळे शहरी चेहरा असलेल्या भाजपला ग्रामीण जनतेने चांगली साथ दिल्याचे ग्रामपंचायत निकालावरून स्पष्ट होते. सहा ठिकाणी पूर्ण भाजप, तर दोन ग्रामपंचायतींवर भाजप समर्थक आवाडे गटाने कब्जा केला आहे.
खासदार धैर्यशील माने गटाने एक, तर जनसुराज्यने वारणा पट्ट्यातील 7 ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. याउलट चित्र महाविकास आघाडीचे आहे. वरिष्ठ नेतृत्वाने गावच्या राजकारणात लक्ष न दिल्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अस्तित्व कुठेच दिसले नाही. काँग्रेसकडे सहा, तर उध्दव ठाकरे गटाकडे दोन, स्वाभिमानीने एका ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला. अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची दमछाक होऊ शकते.
पक्षीय पातळीवर मेळ बसत नसल्याने काही गावांमध्ये स्थानिक आघाड्यांकडून निवडणूक लढवल्या गेल्या. यात त्यांना चांगले यश मिळाले. 10 ग्रामपंचायतींवर आघाड्यांचे वर्चस्व राहिले आहे. भविष्यातील राजकारणात या आघाड्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
भाजप – 6
जनसुराज्य – 7
शिंदे सेना – 1
ताराराणी पक्ष (आवाडे) – 2
ठाकरे सेना – 2
काँग्रेस – 5
मनसे – 1
स्वाभिमानी – 1
राष्ट्रवादी – 0
स्थानिक आघाडी – 14