बिल्डरच्या घरामध्ये 23 लाखांची दागिने चोरी | पुढारी

बिल्डरच्या घरामध्ये 23 लाखांची दागिने चोरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

हडपसर परिसरातील मगरपट्टा येथे एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरातील 23 लाख 50 हजार रुपये किमतीचे हिर्‍याचे दागिने लंपास झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून राधा अशोक झा (वय 37, रा. वैदूवाडी, हडपसर) या मोलकरणीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. मगरपट्टा या उच्चभ्रू सोसायटी परिसरात मलबेरी गार्डन या ठिकाणी एका व्यावसायिकाचे घर आहे.

व्यावसायिकाच्या घरी कामासाठी येणार्‍या 37 वर्षीय महिलेने घरातल्या सदस्यांची नजर चुकवून 23 लाख 50 हजार रुपयांचे हिर्‍याचे दागिने चोरी केल्याचा संशय आहे. तिचा शोध घेतला असता ती पसार झाल्याचे दिसून आले. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी घरकाम करणार्‍या महिलेचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे आता घरकाम करणार्‍या महिलांच्या चारित्र्य पडताळणीचा विषय चर्चेत आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलिस करीत आहेत.

फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक असून चोरी करण्यात आलेली रक्कम मोठी असून या प्रकरणातील संशयित मोलकरणीला अटक करण्यात आली आहे. तिच्याकडे चोरीच्या ऐवजाबाबत चौकशी करण्यासाठी न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
– विजयकुमार शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस ठाणे.

हेही वाचा :

Back to top button