पारनेर : व्यवस्थापकाला गोळी घालत पतसंस्थेत लूट | पुढारी

पारनेर : व्यवस्थापकाला गोळी घालत पतसंस्थेत लूट

पारनेर/वाडेगव्हाण : पुढारी वृत्तसेवा : नगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील बेलवंडी फाटा येथील पारनेर ग्रामीण पतसंस्थेत अज्ञात दरोडेखोराने शाखा व्यवस्थापकाला गोळी घालून सुमारे 5 लाख रुपयांची रोकड लंपास केली.

छातीत गोळी लागल्याने शाखा व्यवस्थापक बाळासाहेब सोनवणे हे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि.7) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, चोर एकच होता. तो दुचाकीवरून आला होता आणि त्याने डोक्यात हेल्मेट घातले होते. हातात बंदूक घेऊनच तो पतसंस्थेत आला. रोखपाल महिलेला धमकावून पाच लाख 20 हजारांची रोकड ताब्यात घेतली.

परत फिरत असताना त्याचा शाधिकारी सोनवणे यांच्याशी सामना झाला. त्यांना हूल देत चोर पळून जाऊ लागल्याने सोनवणे यांनी हाती आलेला तेथील झाडू घेतला. त्याचे एक दोन फटकेही चोराला मारले. तेव्हा चोराने गोळी झाडली.

त्यात शाखाधिकारी बाळासाहेब सोनवणे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर चोर दुचाकीवरून पळून गेला. त्याचे आणखी कोणी साथीदार होते का? या बद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.

सोनवणे यांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शिरूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तेथून त्यांना पुणे येथे हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ दाते हेदेखील घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके व सुपा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. पुढील तपास सुपा पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button