बोरामणी शिवारातील खूनप्रकरणी दरोडेखोरांच्या टोळीस ‘मोका’ | पुढारी

बोरामणी शिवारातील खूनप्रकरणी दरोडेखोरांच्या टोळीस ‘मोका’

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी शिवारात गुन्हेगारांनी दरोडा टाकून वृद्धाचा खून केला होता. गुन्हेगारांच्या या टोळीवर ‘मोका’ची कारवाई करण्यात आली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी या कारवाईस मंजुरी दिली. मोका न्यायालयाने या सर्व गुन्हेगारांना 17 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अटक केलेल्या गुन्हेगारांच्या टोळीतील अद्यापही दोघेजण फरार आहेत.

वैभव ऊर्फ भोरड्या एकनाथ काळे (रा. फकराबाद, जि. अहमदनगर), संतोष झोडगे (रा. डोकेवाडी, ता. भूम, जि. उस्मानाबाद), अजय देवगण ऊर्फ देवगण सपा शिंदे (रा. शेळगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), सुनील ऊर्फ गुल्या सपा शिंदे (रा. शेळगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), ज्ञानेश्वर लिंगू काळे (रा. पांढरेवाडी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), विकास नागेश भोसले (रा. डोकेवाडी, ता. भूम, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. अक्षय काळे (रा. पिंपळगाव, ता. जामखेड, जि. अहमदनगर) आणि अनुज ऊर्फ भैय्या नागनाथ भोसले (रा. डोकेवाडी, ता. भूम, जि. उस्मानाबाद) हे दोघे अद्याप फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

बोरामणी ते दर्गनहळ्ळी रस्त्यावरील हिरजे वस्ती व पाटील वस्तीवर 9 मार्च 2022 रोजी पहाटे दरोडेखोरांनी दरोडा टाकला. पाटील वस्तीवरील नागरिकांनी विरोध केल्यामुळे दरोडेखोरांंनी हिरजे वस्तीवर सशस्त्र दरोडा टाकून बाबुराव सोमनाथ हिरजे (वय 70) यांच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून त्यांचा खून केला. त्यांची पत्नी सुलोचना हिरजे (वय 65) यांच्या गळ्यातील दागिने व घरातील रोख रक्कम असा 75 हजार रुपयांचा ऐवजही लुटून नेला होता. याबाबत सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात दरोड्यासह खूनाचा गुन्हा दाखल झाला होता.

ग्रामीण पोलिसांनी वरील आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने, हत्यार जप्त केली. अटक केलेले सर्वजण ऊसतोड कामगार असून त्यांच्यावर दरोडा, घरफोडी, चोरी यासारखे गुन्हे उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात दाखल आहेत. अटक केलेले गुन्हेगार हे अट्टल असून त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या दरोडेखोरांच्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करावी म्हणून सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्या प्रस्तावास महानिरीक्षक लोहिया यांनी मंजुरी दिली आहे.

दरम्यान, वरील सर्व आरोपी हे न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांना कारागृहातून अटक करून मोक्का न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्व आरोपींना 17 जूनपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, अप्पर पोलिस अधीक्षक हिंम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रविण सपांगे, बंगडगर व त्यांच्या पथकाने केली.

आरोपींमध्ये चौघे सख्खे भाऊ

अटक केलेेल्या संशयितांमध्ये अजय देवगण ऊर्फ देवगण शिंदे व सुनील ऊर्फ गुल्या शिंदे आणि विकास भोसले व अनुज ऊर्फ भैय्या भोसले हे चौघे एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत. इतर आरोपी नातेवाईक आहेत. विकास भोसले हा या टोळीचा म्होरक्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Back to top button