पंढरपूर : ‘उजनी’ वरून बारामतीत आंदोलन करण्याचा ‘स्वाभिमानी’चा इशारा | पुढारी

पंढरपूर : ‘उजनी’ वरून बारामतीत आंदोलन करण्याचा ‘स्वाभिमानी’चा इशारा

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : उजनीचे पाणी पळवून सुरू करण्यात येणारी लाकडी-निंबोळी योजना तत्काळ स्थगित करावी. पालकमंत्र्यांनी मंगळवेढा, मोहोळ तालुक्यातील अपूर्ण योजना अगोदर पूर्ण कराव्यात. सोलापूरच्या हक्काच्या पाण्याला धक्का लावू नये, अशा मागण्या केल्या. या मागण्यांची पूर्तता करा, अन्यथा बारामतीला येऊन तीव्र आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. उजनी धरणातील पाणी पळवून सुरू करण्यात येणार्‍या लाकडी-निंबोळी योजनेला विरोध करण्यासाठी आज मंगळवारी (दि. 23) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपूर -मंगळवेढा रस्त्यावर अनवली चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पान 2 वर

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी या योजनेला कडाडून विरोध करत जोरदार घोषणाबाजी देत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी सुमारे दोन तासाहून अधिक वेळ रास्ता रोको आंदोलन सुरु राहिल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने यावेळी प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लाकडी -निंबोळी योजना तात्काळ स्थगित करावी. उजनी लाभक्षेत्रातील भीमा नदी व डावा उजवा कालव्याचे किती पाणी आहे, याचे पुनर्रावलोकन करून ते आरक्षित करावे. उजनी कालव्याचे पाणी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील टेल पर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक तो निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा. मंगळवेढा तालुक्यातील 35 गावची योजना त्याचबरोबर मोहोळ तालुक्यातील आष्टी एक योजना, सोलापूर जिल्ह्यातील सर्व लहान मोठ्या योजना पूर्ण होईपर्यंत लाकडी निंबोळी योजनेला मान्यता देऊ नये.

उजनी धरण निर्मितीवेळी सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला जे पाणी दिले आहे. तेवढे पाणी आरक्षित करावे आणि त्या पाण्याला कोणी धक्का लावणार नाही, असा राज्यात कायदा करून घ्यावा. भीमा नदी काठावरील सर्व शेतकर्‍यांना पाणी परवाने उपलब्ध करून देऊन बॅरेज बंधारे बांधून देण्यात यावेत, यासह विविध मागण्यांची तत्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलने करण्यात येतील, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

उजनीचे पाणी लाकडी-निंबोळी योजनेला देऊन पालकमंत्र्यांनी शेकर्‍यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. पालकमंत्री कोणाच्या इशार्‍यावर चालतात, हे शेतकरी ओळखून आहेत. अगोदर जिल्ह्यातील अपूर्ण योजना पूर्ण करा. सोलापूर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्याला धक्का लावू नका, अन्यथा बारामती येथे शड्डू ठोकून स्वाभिमानी आंदोलन करेल.

– सचिन पाटील, तालुकाध्यक्ष स्वाभिमानी

Back to top button