मंगळवेढा आरक्षण सोडतीत इच्छुकांना धक्के | पुढारी

मंगळवेढा आरक्षण सोडतीत इच्छुकांना धक्के

मंगळवेढा : पुढारी वृत्तसेवा मंगळवेढा पंचायत समितीच्या 2022 साली होणार्‍या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दहा गणांची आरक्षण सोडत गुरुवारी तहसील कार्यालयात पार पडली. यात दामाजीनगर, बोराळे, भोसे सर्वसाधारण तर निंबोणी, रड्डे, लक्ष्मी दहिवडी सर्वसाधारण महिला आरक्षित झाले आहेत. मरवडे गण अनुसूचित जाती, हुलजंती गण अनुसूचित जाती महिला, चोखामेळानगर ओबीसी महिला, नंदेश्वर ओबीसी आरक्षण निघाले असून त्यामध्ये अनेक प्रस्थापितांना धक्के बसणार असले. तरी नव्या इच्छुकांना ही पंचायत समिती सदस्य होण्याची संधी मिळणार आहे.

तहसील कार्यालयमध्ये उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत पार पडली. यावेळी तहसीलदार स्वप्निल रावडे, तहसीलदार सुधाकर धाईंजे, वैभव शिंदे, सायली जाधव, गुणवंत वाघमोडे, उमाकांत मोरे आदी उपस्थित होते. तालुक्यात वाढत्या लोकसंख्येनुसार तालुक्यामध्ये यापूर्वी 8 पंचायत समिती गण अस्तित्वात होते. नव्या रचनेनुसार दोन गणांची भर पडली. त्यामध्ये सभापती प्रेरणा मासाळ यांचा हुलजंती पंचायत समिती गण यंदा महिलेसाठी आरक्षित तर उपसभापती सुरेश ढोणे यांचा भोसे पंचायत समिती गण हा पुन्हा सर्वसाधारणसाठी आरक्षित राहिला.इच्छुकांची संख्या सर्वाधिक असलेला मरवडे पंचायत समिती गण हा आरक्षित झाल्याने नवीन चेहरा शोधावा लागणार आहे. तर नव्याने झालेल्या निंबोणी पंचायत समिती गण महिलांसाठी आरक्षित तर चोखामेळा नगर हा गण इतर मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित झाला.

नंदेश्वर इतर मागासवर्गीयसाठी रड्डे व लक्ष्मी दहिवडी हा गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित तर बोराळे व दामाजी नगर हा गण सर्वसाधारण राहिला आहे. आरक्षण सोडतीच्या वेळी अनेक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या गणातील आरक्षण सोडतीवर लक्ष ठेवून होते. त्यामध्ये काहींचा हिरमोड झाला. मरवडे व हुलजंती यात राखीव महिलांसाठी, नंदेश्वर व चोखामेळा नगर या इतर मागासवर्गीय महिलेसाठी तर भोसे व निंबोणी सर्वसाधारण महिलेसाठी या जागेवर काव्या बबन लोंढे या मुलीच्या हस्ते चिठ्ठी टाकण्यात आली. दहा गणांची आरक्षण सोडत तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी जाहीर केली. नव्या आरक्षण सोडतेमुळे विद्यमान पदाधिकार्‍यांतील सभापती प्रेरणा मासाळ, माजी सभापती प्रदीप खांडेकर, कल्पना गडदे, उज्वला मस्के, नितीन पाटील यांना मात्र नव्या आरक्षणाचा फटका बसला आहे.

Back to top button