शिरूरमध्ये रंगतदार लढत! कोण बाजी मारणार? | पुढारी

शिरूरमध्ये रंगतदार लढत! कोण बाजी मारणार?

सुषमा नेहरकर- शिंदे

बारामतीपाठोपाठ संपूर्ण राज्याचे आणि पुणे जिल्ह्याचे लक्ष लागलेली हायव्होल्टेज लढत शिरूर लोकसभा मतदार संघात होऊ घातली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असे या मुकाबल्याचे स्वरूप असल्याचे दिसून येते. त्यामुळे दोन्ही पवारांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे. शिरूरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी आव्हान दिले आहे. या दोघांत कोण बाजी मारणार, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदार संघातील शिरूरचे आमदार सोडले, तर चारही आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट अजित पवार यांच्या सोबत राहिला. शरद पवार यांनी त्यानंतर येथील आमदारांना जाहीर आव्हान दिले होते. यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शिरूर लोकसभेचा अजित पवार गटाचा उमेदवार निश्चित करतानाही मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी झाल्या. अखेर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे आढळराव-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा व सर्वाधिक मतदार संख्या असलेला मतदार संघ म्हणूनही शिरूरकडे पाहिले जाते.

या मतदार संघात जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर हे ग्रामीण मतदार संघ, तर भोसरी आणि हडपसर हे पूर्णपणे शहरी असलेल्या मतदार संघांचा समावेश आहे. आतापर्यंत जुन्नर, आंबेगाव आणि खेडमध्ये ज्याला अधिक मतदान तो विजयी, असे सूत्र होते. त्याच उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात होता. वाढती मतदारसंख्या लक्षात घेतली, तर परिस्थितीत झालेला लक्षणीय बदल लक्षात येईल. यामध्ये भोसरी, हडपसर, शिरूरची मतदारसंख्या जुन्नर, आंबेगाव आणि खेडच्या तुलनेत दुप्पटपेक्षा अधिक आहे. यामुळेच शिरूर लोकसभेच्या विजयामध्ये यंदा ग्रामीण मतदारांपेक्षा शहरी मतदारांची भूमिका निर्णायक स्वरूपाची राहणार आहे. त्यात दोन्ही प्रमुख उमेदवार कोल्हे जुन्नर विधानसभा मतदार संघातून, तर आढळराव आंबेगाव मतदार संघातून येतात. या दोन्ही उमेदवारांना आपल्या ‘होमपिच’वर मताधिक्य मिळाले तरी भोसरी, हडपसर, शिरूर आणि खेडचा शहरी मतदार कुणाच्या पारड्यात मतदान टाकणार, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे.

दोन्ही नेते घेणार विक्रमी प्रचारसभा

बारामतीतील लोकसभेचे मतदान संपताच शरद पवार आणि अजित पवार शिरूरच्या मैदानात उतरले आहेत. शरद पवार यांनी शिरूर, तर अजित पवार यांनी जुन्नर, आंबेगावमध्ये प्रचारसभांचा धडाका लावला आहे. पुढील चार दिवस हे दोन्ही नेते आपापल्या उमेदवारांसाठी मोठ्या संख्येने प्रचारसभा घेणार आहेत. एखाद्या उमेदवारासाठी शरद पवार किंवा अजित पवार यांनी एवढ्या सभा घेण्याची ही पहिलीच वेळ म्हणावी लागेल. यावरूनच दोन्ही पवारांनी शिरूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक किती प्रतिष्ठेची केली, हे सहज समजू शकते. प्रामुख्याने अजित पवार आणि त्यांचे आमदार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची व अस्तित्वाची असल्याने या मतदार संघात तीव्र चुरस निर्माण झाली आहे.

राजकीय समीकरणे बदलली

शिरूर लोकसभा मतदार संघातील लढत जुनीच असली, तरी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे लढत रंगतदार ठरणार आहे. सध्या मतदार संघात दोन्ही उमेदवारांकडून एकमेकांवर वैयक्तिक टीका करण्यावर अधिक भर दिला जात आहेत. यात मतदार संघाचे मुख्य प्रश्न बाजूला राहिल्याचे दिसून येते. बिबट्यांकडून होणारे हल्ले, नाशिक आणि सोलापूर महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी, वाढत्या नागरीकरणामुळे प्रशासन व्यवस्थेवर येणारा ताण या मुख्य समस्यांवर प्रचारादरम्यान चर्चा केली जात नसल्याने सर्वसामान्य मतदार कावल्याचे दिसून येते. 13 मे रोजी या मतदार संघात मतदान होत असून, एकूण 23 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

Back to top button