Loksabha Election 2024 : मोदी यांच्यावर टीका करताना ममतांना इतिहासाचे विस्मरण | पुढारी

Loksabha Election 2024 : मोदी यांच्यावर टीका करताना ममतांना इतिहासाचे विस्मरण

रशीद किडवाई

काचेच्या घरात राहणार्‍यांनी दुसर्‍यांच्या घरावर दगड फेकू नयेत, असे म्हणतात. ते खरेच आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना ते माहीत नसावे. कदाचित, त्या वेड पांघरून पेडगावला जात असाव्यात. याचे कारण म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी केलेली बिनबुडाची टीका. मोदी यांना बंगाली भाषा बोलता येत नाही, हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. या हास्यास्पद शेरेबाजीबद्दल त्यांची किव करावी तेवढी थोडीच. इतिहास असे सांगतो की, देशाच्या अन्य भागांतील अनेक नेत्यांना सामावून घेण्याची समृद्ध परंपरा वंगभूमी अर्थात बंगालला लाभली आहे.

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते व्ही. के. कृष्ण मेनन ते माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणपर्यंत अशा अनेकांना बंगालने आपले मानले आहे. मोदी यांना बंगाली भाषेत बोलता येत नाही, त्यांना बंगाली लिपी समजत नाही, वगैरे गोष्टी ममता यांनी उपस्थित केल्या आहेत. मात्र, त्यांनी स्वतःच्या उमेदवारांच्या यादीवरून एकदा नजर फिरविली, तरी त्यांच्या बोलण्यातील फोलपणा स्पष्ट होईल. युसूफ पठाण, कीर्ती आझाद, शत्रुघ्न सिन्हा या तिघांचा बंगालशी अथवा तिथल्या संस्कृतीशी दुरान्वयानेही संबंध नाही. असे असूनही हे तिघे तृणमूलच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. यातील पठाण हा मूळचा गुजरातचा असून, आझाद आणि सिन्हा बिहारी बाबू आहेत. मोदींवर टीकेची झोड उठवताना या तिन्ही उमेदवारांबद्दल ममता यांनी सोयीस्कर मौन पाळल्याचे दिसून येते.

वास्तविक बंगालमधून लोकसभेत प्रवेश करणार्‍या बिगर बांगला भाषिकांची यादी लांबलचक आहे. उदाहरण द्यायचे तर दार्जिलिंग आणि आसनसोलमधून बंगाली जनतेने अनेक वर्षे जसवंत सिंह, इंद्रजित खुल्लर आणि एस. एस. अहलुवालिया यांसारख्या बिगर बंगालींना निवडून दिले आहे. अहलुवालिया यांच्याकडून पराभूत झालेला फुटबॉल स्टार बायचुंग भुतिया हाही शेजारच्या सिक्कीमचा रहिवासी होता. माजी केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेशभाई त्रिवेदी हे मूळचे गुजरातमधील. त्यांनी तृणमूलच्या तिकिटावर बराकपूरची जागा जिंकली होती.

कम्युनिस्टांनीही केले होते समर्थन

दहा वर्षांपूर्वी, विमान बोस यांनी सुहासिनी अली यांना उमेदवारी देण्याच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले होते. यासाठी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि व्ही. के. कृष्ण मेनन यांचे दाखले दिले होते. रेणू चक्रवर्ती (दिवंगत कम्युनिस्ट नेते निखिल चक्रवर्ती यांच्या पत्नी) आणि इंद्रजित गुप्ता हे दिल्लीकेंद्रित राजकारणी होते. तथापि, त्यांनी बंगालमधून निवडणूक लढवली होती हे विसरू नका, असे त्यांनी म्हटले होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर 1946 मध्ये सर्वप्रथम निवडून गेले ते बंगालमधूनच. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली एक अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले होते आणि नेहरूंनी आंबेडकरांची देशाचे कायदा मंत्री म्हणून निवड केली होती. डॉ. आंबेडकरांसाठी ही एक अपूर्व संधी होती. या आधारे हिंदू समाजातील कालबाह्य रुढी दूर करणे, हिंदू स्त्रिया आणि अस्पृश्यांचे कल्याण करण्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिलाचा मसुदा तयार करून तो 4 फेब्रुवारी 1951 रोजी संसदेत मांडला. 1969 मध्ये व्ही. के. कृष्ण मेनन यांनी मिदनापूरमधून विजय मिळवला, तेव्हा त्यांना सत्तारूढ डाव्या सरकारने पाठिंबा दिला होता.

एप्रिल 2009 मध्ये, अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये संरक्षण आणि परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलेले मेजर जसवंत सिंह दार्जिलिंगमधून विजयी झाले होते. इंद्रजित खुल्लर, सुरिंदर सिंग ऊर्फ एस. एस. अहलुवालिया हेही बंगालमधूनच संसदेवर निवडून गेले. त्यावेळी राजीव गांधी यांच्यावर टीका करणार्‍यांवर हल्लाबोल करण्यात अहलुवालिया नेहमीच आघाडीवर असायचे. नंतर सोनिया गांधी यांच्याकडून त्यांची उपेक्षा सुरू झाली. त्यामुळे त्यांनी पी. व्ही. नरसिंह राव यांच्याशी हातमिळवणी केली आणि केंद्रात मंत्री बनले. नंतर यथावकाश त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सोनिया गांधी यांच्यावर ते सडकून टीका करू लागले. त्यामुळे भाजपचे आवडते प्रवक्ते असा त्यांच्या नावाचा उल्लेख होऊ लागला. हा सारा इतिहास ममता बॅनर्जी यांना माहीत असेल, असे वाटते. मात्र, असे असूनही त्या मोदींवर आक्षेपार्ह शेरेबाजी करतात, तेव्हा त्या स्वतःच हास्यास्पद ठरतात.

Back to top button