Lok Sabha Election 2024 | चिकोडी : मंत्री कन्या की जोल्ले पुन्हा? | पुढारी

Lok Sabha Election 2024 | चिकोडी : मंत्री कन्या की जोल्ले पुन्हा?

गोपाळ गावडा , चिकोडी

विधानसभा निवडणुकीतील यश लोकसभा निवडणुकीतही मिळविण्यासाठी काँग्रेसने पाच मंत्र्यांच्या मुला-मुलींना उमेदवारी दिली आहे, तर आणखी तीन मंत्र्यांच्या नातेवाईकांना रिंगणात उतरविले आहे. त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे चिकोडी. येथून बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पाटबंधारे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या कन्या प्रियांका टक्कर देणार आहेत, त्या भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांना.

सलग सात वेळा काँग्रेस नेते बी. शंकरानंद यांना निवडून देणारा मतदारसंघ म्हणजे चिकोडी. मात्र, 1996 मध्ये तो अश्वमेध रोखला तो जनता दलाच्या रत्नमाला सावनूर यांनी. 2009 पासून इथे भाजप, काँग्रेस, भाजप अशी सत्ता फिरत राहिली आहे. आताही ती फिरावी याचसाठी, भाजप खासदार अण्णासाहेब जोल्ले यांना टक्कर देण्यासाठी खुद्द पालकमंत्री प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. त्यांच्या कन्या प्रियांका यांची कुठल्याही स्तरावरची ही पहिलीच निवडणूक. यावरून काँग्रेस इथे उलटफेर करण्यासाठी किती उत्सुक आहे, हे लक्षात यावे.

मतदार संघात हळूहळू वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. खासदार जोल्ले यांनी मतदार संघात लिंगायत समाजाचे प्राबल्य असल्याने मठाधीशांचा आशीर्वाद घेण्याबरोबरच नेत्यांशी संपर्क चालू ठेवला आहे. पालकमंत्री जारकीहोळी यांनी मतदार संघातील प्रमुख नेत्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन आपल्या मुलीच्या विजयासाठी प्रयत्न चालविला आहे. उमेदवार प्रियांका यांनी यमकनमर्डी वडिलांच्या विधानसभा मतदार संघातून बंधू राहुल जारकीहोळी यांच्यासमवेत संपर्क दौरा सुरू केला आहे. 7 मे रोजी होणारी निवडणूक काँटे की होणार, असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

राज्यात भाजपने निधर्मी जनता दलाशी युती केली आहे. त्यामुळे या पक्षाची मते भाजपच्या पारड्यात कितपत पडतात, याकडे नेत्यांचे लक्ष आहे. जोल्ले यांच्याकडे संघटन कौशल्य आहे. त्यांनी आपल्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवला आहे. केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी मतदार संघात केली आहे. निवडणुकीची तयारी सहा महिन्यांपासून सुरू आहे. या त्यांच्या जमेच्या बाजू असल्या तरी मतदार संघातील भाजप नेत्यांची नाराजी दूर करून दुसर्‍यांदा विजय मिळवण्याची कसोटी त्यांना पार पाडावी लागणार आहे.

मतदार संघातील पाच विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे आमदार आहेत. शिवाय निपाणी व रायबागमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांना सोबत घेऊन काँग्रेसला विजय सुकर करता येणार आहे. मात्र, त्यांचा चेहरा चिकोडी लोकसभा मतदार संघाबाहेरील मानला जातो. कारण प्रियांका यांचा स्वतःचा निपाणी- चिकोडी भागाशी जास्त संपर्क नाही. सध्या जारकीहोळी कुटुंबात चार आमदार आहेत, पैकी दोन भाजपमध्ये, तर दोन काँग्रेसमध्ये आहेत. जातीच्या समीकरणात त्यांना विजयासाठी झगडावे लागणार आहे.

सत्तेच्या सारिपटावर निवडणुकीचा खेळ सुरू झाला असून, सध्या तरी मतदार संघात वादळापूर्वीची शांतता आहे. निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर प्रचाराची रंगत येणार असून, स्टार प्रचारक प्रचार सभेसाठी येणार असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार, यात शंका नाही.

 

 

Back to top button