पुणे आणि परिसराची हवा ‘स्मॉग’ने बिघडली!

पुणे आणि परिसराची हवा ‘स्मॉग’ने बिघडली!

पुणे : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून शहरात पहाटे व रात्रीच्या वेळी दाट धुके दिसत आहे. मात्र, केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या यादीत याची नोंद स्मॉग म्हणून घेतली जात आहे. धुके आणि प्रदूषित हवा मिळून शहरात तयार होणार्‍या स्मॉगमुळे हवेची गुणवत्ता मध्यम प्रकारात मोडली जात आहे. ही पातळी अनारोग्यकारक असल्याची नोंद घेण्यात आली आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात पहाटे व रात्रीच्या वेळी दाट धुके दिसत आहे. पहाटे हे धुके इतके दाट आहे, की इमारती गायब झालेल्या दिसतात. काही दिवसांपासून पर्वती टेकडीही पहाटे दिसत नाही. सकाळी साडेसातनंतरच धुक्यात हरवलेल्या इमारती दिसतात. शहरातील या वातवरणाची नोंद स्मॉग म्हणून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळासह विदेशातील हवामानाची नोंद घेणार्‍या संस्थांनी दखल घेतली आहे.

धुके आणि वाहनातून ज्वलन होऊन बाहेर पडलेले धूलिकण जीएम 10 व पीएम 2.5 या सूक्ष्म व अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. हवेची गुणवत्ता 70 ते 90 मायक्रो ग्रॅम प्रति चौ. मी. इतकी असते. मात्र, सध्या 100 च्या वर गेली आहे. रविवारी ही पातळी 122 वर गेल्याने ती अनारोग्य प्रकारात गणली गेली.

''स्मॉग हे श्वसनविकार असणार्‍या रुग्णांना धोकादायकच असते. अशा वातावरणात श्वसनविकाराबाबत संवेदनशील असणार्‍या रुग्णांनी सकाळी खूप लवकर व रात्री शक्यतो बाहेर पडू नये. बाहेर जाताना सतत मास्कचा वापर करावा. ऊबदार कपडे घालावेत.''

                                                                                                                            – डॉ. हिमांशू पोफळे, श्वसनविकारतज्ज्ञ

  • शहराच्या हवेची सरासरी गुणवत्ता 122 वर

  • शिवाजीनगर, हडपसर, आळंदी, कोथरूड, पाषाण, विठ्ठलनगर, भूमकर चौकात धूलिकणांचे प्रमाण वाढले

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news