ओमायक्रॉनच्या परिस्थितीत बूस्टर डोसचा फायदा होणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे | पुढारी

ओमायक्रॉनच्या परिस्थितीत बूस्टर डोसचा फायदा होणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : पुढारी ऑनलाईऩ डेस्क

कोरोना महामारीच्या लढाईचा पुढचा टप्पा म्हणून येत्या 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री उशिरा केली. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांसह फ्रंटलाईन वर्कर्सना प्रिकॉशन डोस (बूस्टर) देण्याची मोहीम 10 जानेवारीपासून सुरू करण्यात येईल, तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बूस्टर डोस देण्यात येईल, असेही मोदी यांनी सांगितले.

डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयाचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केले आहे. आपण १६ नोव्हेंबर रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन बूस्टर डोस देण्याची तसेच मुलांना लस देण्याची मागणी केली होती. आता ही मागणी मान्य झाली याचे समाधान आहे, असे टोपे यांनी म्हटले आहे.

पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांना देखील लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्‍चितपणे मदत होईल तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील बूस्टर डोसमुळे कोविडची बाधा होण्याची शक्यता कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

ओमायक्रॉनच्या वाढत्या परिस्थितीमध्ये बुस्टर डोसचा फायदा होईल. यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने आम्ही योग्य नियोजन करु. संपूर्ण लसीकरणाचे काम महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वतीने केले जाईल, असे टोपे यांनी सांगितले.

देशाला संबोधित केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी नववर्षाचे स्वागत सर्व ती काळजी घेऊन करण्याचे आवाहन केले आहे. जगातील सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेमुळे कोरोनाविरोधात भारताने यशस्वी कामगिरी केली आहे, याचा अभिमान वाटतो. आता आपल्याला आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पाडायचा आहे. मुलांचे लसीकरण आणि डॉक्टर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस हा तो टप्पा असेल. तोही यशस्वी होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

मोदी म्हणाले, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच आम्ही लसीकरणासंदर्भातील निर्णय घेतले आहेत. सध्या ओमायक्रॉनचा संसर्ग सुरू आहे. अनेक
देशांत त्याचे निष्कर्ष वेगवेगळे आहेत. भारतातील शास्त्रज्ञही यावर बारीक नजर ठेवून आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला शनिवारी 11 महिने पूर्ण झाले आहेत. या कालावधीमध्ये शास्त्रज्ञांनी संपूर्ण गोष्टींचा अभ्यास केला आहे. त्यानंतरच काही निर्णय घेण्यात आले.

हे ही वाचा :

Back to top button