खंडणीखोर पुजारी गँगचा बिमोड | पुढारी

खंडणीखोर पुजारी गँगचा बिमोड

ठाणे,  नरेंद्र राठोड:  पुजारी गँगचा बिमोड : भल्याभल्या अंडरवर्ल्ड गँगस्टरांचा कणा पोलिसांनी मोडल्यानंतर जवळपास अंडरवर्ल्डमधील बहुतांश डॉन शांत झाले असताना गँगस्टर रवी पुजारीने आणि सुरेश पुजारींनी मात्र आपली नजर ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर या भागातील व्यापाऱ्यांवर एक दशकाहून अधिक काळ रोवलेली होती. ठाणे ते बदलापूरपर्यंत अनेक व्यापारी अन बिल्डर लॉबीकडून पुजारी गॅंग प्रोटेक्शन मनी उकळण्यासाठी दहशत पसरवत होते. पुजारी टोळी व त्यांच्या हस्तकाविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, धमकी असे एकूण पंचवीस गुन्हे ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत नोंदवण्यात आले आहेत.

पुजारी टोळीने २०११ ते २०१८ या काळात जिल्ह्यातील अनेक बडे राजकीय नेते, बिल्डर, उद्योजक, व्यापारी यांना खंडणीसाठी धमकावत सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे जिल्ह्यात पुजारी टोळीची मोठी दहशत होती. मात्र, भारतीय तपास यंत्रणेने रवी पुजारी व सुरेश पुजारी दोघांच्या मुसक्या आवळून त्यांना गजाआड केल्याने पुजारी गँगचा बिमोड झाल्यात जमा आहे.

ऐंशी व नव्वदच्या दशकात खंडणी अन प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली काेट्यवधी रुपये उकळण्याचा धंदा अंडरवर्ल्डमध्ये मोठ्या तेजीत होता. मात्र, काळानुरूप हा प्रोटेक्शन मनीचा धंदा पोलिसांच्या नजरेत आला. पोलिसांनी मागील काही वर्षात तो मोडून देखील काढला. मुंबईनंतर ठाणे जिल्ह्यात प्रोटेक्शन मनीचा हा धंदा रुजवण्यासाठी काही गुंड प्रयत्नशील होते. त्यात रवी पुजारी आणि सुरेश पुजारी हे दोघे गँगस्टर आघाडीवर होते. त्यापैकी रवी पुजारी यास पश्चिम आफ्रिकेतल्या सोनेगलमधून दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात येऊन त्यास भारतात आणण्यात आले आहे. तो सध्या कर्नाटक पोलिसांच्या पोलीस काेठडीत आहे.

दरम्यान, रवी पुजारीवर ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत उल्हासनगर येथील केबल व्यावसायिक सच्चानंद कारीरा यांच्या हत्येसह, हत्येचा प्रयत्न, खंडणी, धमकी असे पंचवीसहून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी १६ गुन्ह्यात त्याच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. रवी पुजारीने काही स्थानिक हस्तकांच्या मदतीने ठाणे जिल्ह्यातील बिल्डर व व्यावसायिकांना खंडणीसाठी सळो की पळो करून सोडले होते. फक्त बिल्डर आणि व्यावसायिकच नव्हे तर राजकीय नेत्यांना देखील खंडणीसाठी धमकावण्यापर्यत त्याने मजल गाठली होती.

उल्हासनगर येथील नगरसेवकासह उल्हासनगर, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, कळवा आदी भागातील अनेक बिल्डर व व्यावसायिकांना त्याने खंडणीसाठी धमकावले होते. याच दरम्यान रवीने खंडणी देण्यास नकार देणाऱ्या उल्हासनगर येथील केबल व्यावसायिक सच्चानंद कारीरा यांची आपल्या हस्तकामार्फत हत्या घडवून आणली होती.

कुख्यात गुंड सुरेश पुजारी याने २०१५ ते २०१८ या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आदी भागातील बिल्डर व व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावन्याचे प्रकार सुरु केले होते. याच कालावधीत खंडणीसाठी धमकी दिल्याचे अनेक गुन्हे सुरेश पूजारीवर दाखल करण्यात आले आहेत. तर उल्हासनगर मधील एका व्यावसायिकवर गोळीबार केल्याप्रकरणी देखील सुरेश पुजारीवर गुन्हा दाखल आहे. फिलिपाईनमध्ये बसून खंडणीची सूत्र हलविणारा सुरेश पुजारीला नुकतेच अटक करून भारतात आणण्यात आले आहे. तो सध्या राज्य एटीएस पथकाच्या ताब्यात आहे.

पुजारी गँगची दहशत संपुष्टात

२०१५ ते २०१८ या काळात गँगस्टर रवी पुजारी व सुरेश पुजारी या दोघा गुंडांनी ठाण्यात आपल्या काळ्या धंद्यावर मजबूत पकड बनवली. या दोघा गुंडांनी ठाणे ते बदलापूर या पट्ट्यात आपले कारनामे मोठ्या प्रमाणात सुरु केले . रवी पुजारी त्यावेळी अनेक नामवंत बिल्डर अन व्यापाऱ्यांकडून दरमहा करोडोची रक्कम प्रोटेक्शन मनी म्हणून उकळत होता. बिल्डरच नव्हे तर चक्क नगरसेवक, आमदार अशा लोकप्रतिनिधींना देखील खंडणीसाठी धमकवण्यापर्यत त्याची मजल पोहोचली होती.

याच काळात पुजारी गॅंग इतकी निर्ढावली होती ते पोलिसांना देखील जुमानत नव्हते. या काळात पुजारी गँगला काही स्थानिक पोलीस अधिकारी मदत करीत असल्याच्या तक्रारी काही बिल्डरांनी त्यावेळी केल्या होत्या. मात्र, रवी पुजारी यास भारतीय तपास यंत्रणांनी बेड्या ठोकल्यानंतर त्यास मदत करणारे सारेच सूत्र पडद्याआड गेले. त्यानंतर आता सुरेश पुजारी यास देखील गजाआड करण्यात यश मिळाल्याने सारी पुजारी गॅंग संपुष्टात आल्याचे चित्र आहे.

गुन्हेगारी जगतात भाऊबंदकी

कुप्रसिद्ध गुंड रवी पुजारी आणि सुरेश शेट्टी उर्फ पुजारी हे दोघेही सख्खे भाऊ नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचे फक्त आडनाव सारखे आहे. या आडनावामुळेच रवी व सुरेश पुजारी सख्खे भाऊ असल्याचा अनेकांचा समज आहे. दोघेही भाऊ नसले तरी त्या दोघांची गुन्हेगारी क्षेत्रात भाऊबंदकी असून हे दोघे पुजारी ब्रदर म्हणूनच अंडरवर्ल्डमध्ये ओळखले जातात. रवी व सुरेश पुजारी यांनी सोबत एकाच गॅंगमध्ये बराच काळ काम केले. नंतर मात्र दोघे वेगळे झाले व त्यांनी आपापल्या स्वतंत्र गॅंग उभ्या केल्या होत्या. रवी व सुरेश वेगळे झाल्यानंतर देखील त्यांची कामाची पद्धत मात्र, सारखाचीच होती.

हेही वाचलंत का? 

Back to top button