नाशिक जिल्ह्यात ५२ महसूल मंडळांना उष्माघाताचा धोका | पुढारी

नाशिक जिल्ह्यात ५२ महसूल मंडळांना उष्माघाताचा धोका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तळपत्या उन्हाबरोबरच जिल्ह्यातील ५२ महसुली मंडळांत उष्मा निर्देशांकाने अतिउच्च धोका पातळी गाठली आहे. वाढत्या उष्मा निर्देशांकाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या मंडळांत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने स्थानिक यंत्रणांमार्फत उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

देशात यंदा उष्णतेची लाट आहे. महाराष्ट्रातील सरासरी तापमानात २ ते ३ अंशांची वाढ झाली आहे. त्यामुळे उष्णतेच्या दृष्टिकोनामधून देशातील अतिसंवेदनशील राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा समावेश आहे. दरवर्षी उन्हाच्या वाढत्या कडाक्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने २०१८ ते २०२२ या काळात हीट स्ट्रेस असेसमेंट करून घेतला आहे. त्यानुसार राज्यातील महसुली मंडळांची विभागणी मध्यम, उच्च व अतिउच्च उष्णता अशा तीन गटांत केली गेली. ज्या मंडळात ३२ ते ४१ डिग्री सेल्सिअस आहे, तेथे मध्यम स्वरूपाचा उष्मांक निर्देशांक मानला जातो. ४१ ते ५४ डिग्री सेल्सिअस दरम्यान धोकादायक स्वरूप, तर ५४ डिग्री सेल्सिअसपुढे अतिधोकादायक निर्देशांक मानण्यात येताे.

जिल्ह्यातील ९२ पैकी ३९ महसुली मंडळे ३९ डिग्री निर्देशांकच्या यादीत आहेत, तर ५२ महसुली मंडळातील उष्णता निर्देशांक ४१ ते ५४ डिग्री असल्याने ती धोकादायक गटात मोडतात. त्यामुळे या सर्व ठिकाणी उष्णता लहरींच्या दृष्टीने महसूल यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच आरोग्य यंत्रणांच्या सहकार्याने विशेष खबरदारी घेतली जात आहे. तालुकास्तरावर उष्माघात नियंत्रणासाठी कक्ष कार्यान्वित केला आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजनांसह जनजागृतीवर भर देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितले.

उष्मा निर्देशांक म्हणजे
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून उष्मा निर्देशांक जाहीर केला जातो. देशाच्या विविध भागांत तापमान व आर्द्रतेचा प्रभाव लक्षात घेत उष्मा निर्देशांक तयार केला जातो. देशात सध्या अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवा, राष्ट्रीय सागरी आणि वातावरणीय व्यवस्थापन संस्थांद्वारे वापरल्या जाणाऱ्या उष्मा निर्देशांक समीकरणाचा वापर करून उष्मा निर्देशांक काढण्यात येतो. या उष्मा निर्देशांकाच्या अनुषंगाने अधिक उष्णता निर्देशांक असलेल्या भागात विशेष खबरदारी घेतली जाते.

अशी घ्या काळजी
तहान लागलेली नसतानाही पाणी प्यावे. हलकी, पातळ, सछिद्र, सुती कपडे वापरावीत. घराबाहेर पडताना छत्री, टोपी, गॉगल, बूट, चप्पल वापरावे. प्रवासात पाण्याची बाटली सोबत ठेवावी, लस्सी, लिंबूपाणी, ताकाचे सेवन करावे. थेट सूर्यप्रकाशाचा संबंध टाळावा, अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

महसुली मंडळ (४१ ते ५४ डिग्री समाविष्ट)
बागलाण : बागलाण (४२.७), डांगसौदाणे (४३.८), जायखेडा (४१.४१), मुल्हेर (४१.६२), नामपूर (४१.२८), विरगाव (४१.६४).
चांदवड : वडनेर भैरव (४१.६४)
देवळा : देवळा (४२.२५), लाेहोणेर (४१.५६).
इगतपुरी : धारगाव (४३.५४), इगतपुरी (४४.२६), नांदगाव बु. (४२.४५).
कळवण : अभोणा (४१.१७), कनाशी (४१.८२), मोकभणगी (४२.८६), नवीबेज (४४.६६).
मालेगाव : दाभाडी (४१.८३), कळवाडी (४२.१६), करंजगव्हाण (४२.२७), कौळाणे (४२.१२), मालेगाव (४१.५८), निमगाव (४२.५), साैंदाणे (४३.७९), सायने बु. (४१.५५), वडनेर (४२.६९), झोडगे (४३.१९).
नांदगाव : हिसवळ (४२.३३)
नाशिक : देवळाली (४२.८), पाथर्डी (४१.५१), सातपूर (४२.१२), शिंदे (४१.२१).
निफाड : देवगाव (४१.५६), रानवड (४१.८), लासलगाव (४२.५२), नांदूर (४४.१३), पिंपळगाव बु. (४३.२१), सायखेडा (४१.२२).
पेठ : जगमोडी (४२.४५), पेठ (४२.४८).
सिन्नर : देवपूर (४२.४६), नांदूरशिंगोटे (४२.८६), पांढुर्ली (४१.१९), शहा (४१.२५), सिन्नर (४१.४९).
सुरगाणा : बाऱ्हे (४१.५२), मानखेड (४३.९९), सुरगाणा (४१.२१), उंबरठाण (४१.४५)
त्र्यंबकेश्वर : हरसूल (४२.९६)
येवला : जळगाव (४४.५४), येवला (४१.४२).

हेही वाचा:

Back to top button