विदर्भाला जलसंकटाची चाहूल! | पुढारी

विदर्भाला जलसंकटाची चाहूल!

राजेंद्र उट्टलवार

नागपूर ः विदर्भात एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा पारा 41 अंशांवर गेला असून, जलसंकटाची तीव्रताही वाढू लागली आहे. सुदैवाने उपलब्ध जलसंपदेमुळे नागपूरसह पूर्व विदर्भात तूर्त चिंता नाही; मात्र भविष्यात विदर्भात भीषण जलसंकट अटळ असल्याचे अनेक प्रकल्पांतील जलसाठा आकडेवारी सांगते.

विदर्भात कडक उन्हाळा असूनही उपलब्ध जलसाठा फारशी चिंता नसल्याचे सांगत असला तरी 50-100 किलोमीटरवरून पाणी वाहून नेताना नगरपरिषद, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असलेल्या जुन्या पाईपलाईन गळतीमुळे हे पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होते. दरडोई वीस वर्षांपूर्वीची जी क्षमता होती, त्या लाईन आता कमकुवत झालेल्या आहेत. पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. वीजपुरवठ्याचे संकट कायम असल्याने पाणी असूनही ते पिण्यासाठी मिळत नसल्याची ओरड कायम आहे.
शेतकर्‍यांच्या द़ृष्टीने विचार करता अनेक प्रकल्पांमध्ये कॅनॉलचे काम पूर्ण झालेले नाही. पाट चार्‍या झालेल्या नाहीत. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन नाही. मेन कॅनॉलमधून पाणी पुरेपूर वापरले जावे याद़ृष्टीने लक्ष दिलेले दिसत नाही. दि. 7 जूनपर्यंत उपलब्ध पाणी पुरेपूर वापरले गेले, तरच उपसा होऊन पाणी स्वच्छ होणार आहे व पूर्णक्षमतेने पाणी साठवण क्षमता वाढू शकेल. त्यासाठी गाळ काढणेदेखील गरजेचे आहे; अन्यथा ‘धरण उशाशी आणि कोरड घशाशी’ ही म्हण विदर्भातील जलसंकटाच्या द़ृष्टीने पुरेशी म्हणता येईल.

पूर्व विदर्भाची स्थिती तूर्त चांगली

– भंडारा जिल्ह्यातील बावनथंडी प्रकल्पात सध्या 28 टक्केच जलसाठा उरला आहे. गोसीखुर्दमध्ये 47 टक्के जलसाठा आहे.
– चंद्रपूरला आसोला मेंढा प्रकल्पात सध्या 35 टक्के साठा आहे.
– गडचिरोलीच्या दिना प्रकल्पात 20 टक्केच पाणी उरले आहे. ही बाब गडचिरोलीसाठी चिंतेची ठरत आहे.
– गोंदिया जिल्ह्यात धापेवाडा प्रकल्पात गेल्यावर्षी 38 टक्के जलसाठा होता. यावर्षी प्रकल्प क्षमता वाढल्याने सध्या 96 टक्क्यांपर्यंत जलसाठा आहे. इटियाडोह प्रकल्पात सध्या 44 टक्के जलसाठा आहे. कालीसरार प्रकल्पात साठा नाही. पुजारी टोला प्रकल्पात 50 टक्के, शिरपूरमध्ये 34 टक्के असा जलसाठा शिल्लक आहे.
– नागपूर शहराला पाणीपुरवठा होणार्‍या कामठी खैरी प्रकल्पात सध्या 110 दशलक्ष घनमीटर पाणी आहे. खिंडसी प्रकल्पात 64 दशलक्ष घनमीटर पाणी असून, तोतलडोह प्रकल्पात 773 दशलक्ष घनमीटर पाणी आहे. वडगावमध्ये 70 दशलक्ष घनमीटर पाणी आहे.

Back to top button