राजाभाऊ वाजेंच्या उमेदवारीला शरद पवारांचे बळ? | पुढारी

राजाभाऊ वाजेंच्या उमेदवारीला शरद पवारांचे बळ?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ठाकरे गटाकडून संभाव्य उमेदवार म्हणून विजय करंजकर यांचेच नाव पुढे करण्यात आले होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी करंजकर यांच्या नावाला नापसंती दर्शविल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. राजाभाऊ वाजे यांच्या उमेदवारीला पवार यांनी संमती दर्शविल्यानंतरच ठाकरे गटाकडून त्यांचे नाव जाहीर केले गेले, अशी चर्चा आहे.

महाविकास आघाडीकडून नाशिकची जागा ठाकरे गटालाच सुटणार हे आधीपासूनच स्पष्ट होते. किंबहुना नाशिक दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनीदेखील नाशिक ठाकरे गटाला, तर दिंडोरीची जागा राष्ट्रवादीला सुटल्याचे जाहीर केले होते. करंजकर हेच आपले उमेदवार असल्याचे ठाकरे गटाने काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते. मात्र, १४ आणि १५ फेब्रुवारी या कालावधीत ठाकरे गटाचे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा झाला. या दौऱ्यांतर्गत सिन्नर भेटीदरम्यान त्यांनी वाजे यांना कामाला लागण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे वाजे यांनी तयारी सुरू करत बाजार समित्या, पंचायत समित्या, जिल्हा परिषद गट व गण यांची सविस्तर माहिती तसेच जातनिहाय मतदारांची संख्या याबाबतची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. निफाड येथील शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनीदेखील करंजकर यांच्याऐवजी वाजे यांना उमेदवारी देण्याचे खा. संजय राऊत यांना सूचित केले होते. त्यामुळेच करंजकर यांची उमेदवारी कापली गेली. या वृत्तास ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनीदेखील दुजोरा दिला आहे. महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी वाजे यांच्या नावाला पसंती दिल्याने करंजकर यांचे नाव मागे पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जातीय समीकरणे रंगणार

वाजे यांच्या उमेदवारीला बळ देऊन शरद पवार यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. नाशिकसाठी महायुतीकडून छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा होत असल्यामुळे पवार यांनी वाजे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत मराठा कार्ड खेळले आहे. यामुळे नाशिकमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा, असा संग्राम बघायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून मविप्र सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे इच्छुक होते. मात्र, त्यांनी भाजपकडूनही उमेदवारीची चाचपणी केल्याने पवार नाराज होते. त्यातूनच ठाकरे यांची उमेदवारीची दोरी कापली गेली. अॅड. ठाकरे आणि वाजे यांचे मामेभावाचे नाते असल्यामुळे मराठा मते कायम राहतील, असा अंदाज आल्याने पवार यांनी वाजे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, असे सांगितले जाते.

Back to top button