नाशिकमध्ये मनसेचा उमेदवार निश्चित? महायुतीकडे जागेची आग्रही मागणी | Lok Sabha Election 2024 | पुढारी

नाशिकमध्ये मनसेचा उमेदवार निश्चित? महायुतीकडे जागेची आग्रही मागणी | Lok Sabha Election 2024

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महायुतीमध्ये मनसे सहभागी होणार, हे जवळपास निश्चित मानले जात असले, तरी मनसेने केलेल्या तीन जागांच्या मागणीमुळे महायुतीमध्ये गुंता वाढण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये तर मनसेने उमेदवार निश्चित झाल्याचे सांगत, या जागेवर आपला दावा अधिक पक्का केला आहे. यामुळे शिवसेनेसह भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. (Lok Sabha Election 2024)

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीवारी करीत भाजप नेते अमित शाह यांची भेट घेत महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले होते. त्यानंतर गुरुवारी (दि. २१) मुंबई येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात प्रदीर्घ बैठक झाली. या बैठकीनंतर मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. तसेच राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेकडे तीन जागांची मागणी केल्याचेही बोलले जात आहे. त्यामध्ये दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिकचा समावेश आहे. दरम्यान, नाशिकच्या जागेवर दावा करताना मनसेने आपला उमेदवार निश्चित असल्याचेही महायुतीच्या नेत्यांना सांगितले आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील शांतिगिरी महाराज हे मनसेचे संभाव्य उमेदवार असल्याचे भाजप आणि सेनेला मनसेकडून स्पष्ट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (Lok Sabha Election 2024)

शांतिगिरी महाराजांची भ्रमंती 

मनसे वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे नाशिकमध्ये आले असता, शांतिगिरी महाराज त्यांची भेट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, ही  भेट अखेरपर्यंत होऊ शकली नाही. ही भेट मुंबई येथे होणार असल्याचे शांतिगिरी महाराजांच्या भक्त परिवाराकडून सांगण्यात आले होते. मात्र, शांतिगिरी महाराज यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत, शिवसेनेकडून लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनीदेखील भाजपच्या तिकिटावर त्यांना नाशिक मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. या सर्व घडामोडी मागे पडल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. आता पुन्हा ते मनसेचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आले आहेत.

हेही वाचा :

Back to top button