शिकारीसह वाघाचा दात बाळगल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल | पुढारी

शिकारीसह वाघाचा दात बाळगल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : नेहमी वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहणारे शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. चार दिवसांपूर्वी त्यांनी केलेले एक वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

आमदार गायकवाड यांनी बुलढाणा येथील शिवजयंती कार्यक्रमात एका स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत देताना वादग्रस्त विधान केले. या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. या व्हिडिओत त्यांनी आपल्या गळ्यातील लॉकेटमध्ये वाघाचा दात असून १९८७ मध्ये आपण वाघाची शिकार केल्याचे विधान केले आहे. या त्यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या शिकारीची चर्चा जोरदार आहे. वनविभागाने त्यांच्यावर आज (दि. २४) याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

वनविभागाने आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याची गंभीरतेने दखल घेतली व वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांच्या पथकाने याप्रकरणी गुरुवारी (दि. २३) आ. संजय गायकवाड यांचे बयाण नोंदवले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील कथित वाघाचा दात जप्त करून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार आ. गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला. जप्त करण्यात आलेला वाघाचा दात हा वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट डेहराडून येथे डीएनए तपासणीसाठी पाठवला जाणार आहे.तेथून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.वाघ हा प्राणी संरक्षित अधिसुची एक मध्ये असून त्याची शिकार करणे वा त्याचे अवयव अंगावर बाळगणे हा दखलपात्र गंभीर गुन्हा आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. अशी माहिती वनविभागातील सुत्रांनी दिली.

Back to top button