जिजाऊच शिवरायांच्या मार्गदर्शक : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार | पुढारी

जिजाऊच शिवरायांच्या मार्गदर्शक : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार

पुणे : आमच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामध्ये माँसाहेब जिजाऊ यांचे योगदान आहे. जिजाबाईंनीच शिवाजी महाराजांच्या आयुष्याला दिशा दिली. पण, जिजाबाईंनी केलेले कर्तृत्व बाजूला सारून त्याचे श्रेय आणखी कोणाला देण्याची भूमिका काही लोक घेत असल्याचे म्हणत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.  आळंदीमध्ये आयोजित गीता- भक्ती अमृतमहोत्सवात  आदित्यनाथ समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविल्याचे म्हटले. त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पुण्यामध्ये पवार बोलत होते. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वत:चं कर्तृत्व, जिजाबाईंचे मार्गदर्शन यामुळे सगळा इतिहास घडला, हे सगळ्या जगाला माहिती असल्याचे म्हणत पवार यांनी योगी आदित्यनाथ यांचा दावा खोडून काढत माँसाहेब जिजाऊच शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक असल्याचं वक्तव्य केले आहे.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून, महाराष्ट्रातील संत आणि थोर व्यक्ती यांच्याबाबत आजवर केवळ भाजपच्याच नेत्यांनी अनेकदा वादग्रस्त आणि आक्षेपार्ह व्यक्तव्य केली आहेत. याच यादीत आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भर पडली. रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं, अशा आशयाचं धादांत खोटं विधान त्यांनी केलं. माझी या भाजपवाल्यांना विनंती आहे ही, एकतर महाराष्ट्रातील संत आणि थोर व्यक्तींचा इतिहास आधी समजून घ्या आणि नंतरच बोला, आणि इतिहास माहीत असूनही जाणीवपूर्वक खोटं बोलत असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

Back to top button