Nashik | सिरीया कारागृहातून महिलेने जमवले इसिससाठी फंडिंग | पुढारी

Nashik | सिरीया कारागृहातून महिलेने जमवले इसिससाठी फंडिंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘इसिस’च्या केलेल्या युद्धात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातलगांच्या उदरनिर्वाहासाठी हवालामार्फत पैसे गोळा करणारी राबिया उर्फ उम्म ओसामा ही महिला सिरीयातील कारागृहात कैद असल्याचे दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासातून समोर येत आहे. कारागृहात राहूनच ही महिला भारतातून फंड गोळा करत असल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या महिलेच्या सांगण्यावरून हवालामार्फत आर्थिक मदत देणाऱ्या नाशिकमधील हुजेफ अब्दुल अजीज शेख (३०, रा. तिडके कॉलनी) यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

‘एटीएस’च्या (Anti Terrorism Squad) पथकाने २२ जानेवारीला तिडके कॉलनीतून संशयित हुजेफ शेख याला अटक केली होती. त्यास न्यायालयाने दि. २३ जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंत एटीएस कोठडी दिली होती. या कालावधीत पथकाने केलेल्या तपासात राबिया नामक महिलेच्या सांगण्यावरून हुजेफने हवालामार्फत आर्थिक व्यवहार करीत पैसे परदेशात पाठवले. केंद्रीय यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार राबिया ही सिरीयातील कारागृहात असून, तेथूनच तिने भारतातून पैसे गोळा केल्याचे समजते. नाशिकसह कर्नाटक, हैदराबाद येथूनही राबियाला अनेकांनी पैसे दिल्याचे ‘एटीएस’च्या (Anti Terrorism Squad) तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी युक्तिवाद केला. सोमवारी (दि. ५) संशयितास पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश मृदुला भाटिया यांच्यासमोर ‘एटीएस’ने न्यायालयीन कोठडी मागितली. त्यानुसार न्यायालयाने हुजेफला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हुजेफवर टेरर फंडिंग केल्याचा आरोप
उच्चशिक्षित संशयित हुजेफ शेख हा अभियंता असून, तो व्यावसायिक आहे. त्याच्या नावे चार ते पाच कंपन्या असून, इतर कंपन्यांमध्येही त्याची भागीदारी आहे. त्याने राबिया नामक महिलेच्या सांगण्यावरून ६५ हजार रुपये तिच्या बँक खात्यात टाकले. ‘एटीएस’ने तपास करीत यात हवालामार्फतही पैसे पाठवल्याचा दावा केला. याबाबत ‘एटीएस’ने १५ हजार पानांचा पंचनामा न्यायालयात सादर केला. संशयिताचे विविध सोशल माध्यमांतील नऊ खाते आढळले असून, त्यातील ४०० एमबी डेटाही ‘एटीएस’ने संकलित केला आहे.

संशयिताची १६ दिवस एटीएस कोठडी राखून ठेवली आहे. या प्रकरणात इतर संशयितांचाही सहभाग समोर येत आहे. इसिसला निधी पाठविणाऱ्या इतरांना ताब्यात घेतल्यावर संशयिताचा ताबा पुन्हा एटीएस घेईल. – ॲड. अजय मिसर, विशेष सरकारी वकील.

Back to top button