ICC Awards 2023 : कोहली, जडेजा सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या शर्यतीत | पुढारी

ICC Awards 2023 : कोहली, जडेजा सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या शर्यतीत

दुबई, वृत्तसंस्था : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शुक्रवारी आयसीसी पुरस्कार 2023 (ICC Awards 2023) साठीची नामांकने जाहीर केली असून, भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ (सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफी) पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. आयसीसीने ‘पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर’, आयसीसी ‘महिला क्रिकेटर ऑफ द इयर रॅचेल हेहो फ्लिटं ट्रॉफी’ आणि आयसीसी ‘पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफी’साठी नामांकने जाहीर केली आहेत. जागतिक क्रिकेट चाहते आता नऊ आयसीसी पुरस्कार श्रेणींमध्ये मतदान करू शकतात. आयसीसी पुरस्कार 2023 चे विजेते जानेवारी 2024 च्या शेवटी घोषित केले जातील. या यादीत एकूण सहा भारतीय खेळाडूंचा समावेश असला, तरी एकाही महिला खेळाडूला स्थान मिळालेले नाही.

‘सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफी’साठी नामांकित व्यक्तींमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारताचे प्रत्येकी दोन उमेदवार आहेत. हे दोन्ही संघ वन डे वर्ल्ड कप व जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये एकमेकांसमोर भिडले होते. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने त्या दोन्ही प्रसंगी जेतेपद पटकावले होते. त्यामुळे कमिन्सला वर्षातील ‘सर्वोत्तम खेळाडू’च्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. कमिन्सने 2019 मध्ये ‘सर्वोत्तम कसोटी खेळाडू’चा पुरस्कार पटकावला होता. 2023 मध्ये त्याने कसोटी आणि वन डे सामन्यांमध्ये 59 विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेडनेही संघाच्या यशात सिंहाचा वाटा उचलला. त्याने दोन्ही फायनलमध्ये दमदार फलंदाजी करून सामनावीर पुरस्कार जिंकला होता. त्याने वर्षभरात सर्व फॉरमॅटमध्ये जवळपास 1700 धावा केल्या आहेत. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी 2023 हे वर्ष उल्लेखनीय राहिले आहे. तो तिसर्‍यांदा ‘सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफी’ जिंकण्याच्या स्पर्धेत आहे.

अशी आहेत नामांकने (ICC Awards 2023)

आयसीसी पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफी : पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया), ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), रवींद्र जडेजा (भारत), विराट कोहली (भारत).

आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द इयर रॅचेल हेहो फ्लिटं ट्रॉफी : चमारी अटापटू (श्रीलंका), अ‍ॅशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया), बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया), नॅट सायव्हर-ब्रंट (इंग्लंड).

आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर : आर अश्विन (भारत), ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया), जो रूट (इंग्लंड).

आयसीसी पुरुष वनडे क्रिकेटर ऑफ द इयर : शुभमन गिल (भारत), विराट कोहली (भारत), डॅरिल मिशेल (न्यूझीलंड), मोहम्मद शमी (भारत).

आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर : चमारी अटापटू (श्रीलंका), अ‍ॅशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया), अमेलिया केर (न्यूझीलंड), नॅट सायव्हर-ब्रंट (इंग्लंड).

आयसीसी पुरुष टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर : मार्क चॅपमन (न्यूझीलंड), अल्पेश रामजानी (युगांडा), सिकंदर रझा (झिम्बाब्वे), सूर्यकुमार यादव (भारत).

आयसीसी महिला टी- 20 क्रिकेटर ऑफ द इयर : चमारी अटापटू (श्रीलंका), सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड), हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडीज), एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया).

आयसीसी इमर्जिंग मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर : जेराल्ड कोएत्झी (दक्षिण आफ्रिका), यशस्वी जैस्वाल (भारत), दिलशान मदुशंका (श्रीलंका), रचिन रवींद्र (न्यूझीलंड).

आयसीसी उदयोन्मुख महिला क्रिकेटर ऑफ द इयर : मारुफा अख्तर (बांगला देश), लॉरेन बेल (इंग्लंड), डार्से कार्टर (स्कॉटलँड), फोबी लिचफिल्ड (ऑस्ट्रेलिया).

Back to top button