धान्य कमिशन घोटाळा : धान्य कमिशन घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश | पुढारी

धान्य कमिशन घोटाळा : धान्य कमिशन घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

मांजर्डे; पुढारी वृत्तसेवा

तासगाव तालुक्यात कोरोना काळात मोफत धान्य वितरण केल्याबद्दलच्या कमिशनच्या वसुलीबाबत सहकारी संस्था आक्रमक झाल्या आहेत. प्रशासनाने ज्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली आहे, ते मात्र संभ्रमात आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (धान्य कमिशन घोटाळा)

कोरोना काळात दि. 1 एप्रिल 2020 ते दि. 31 मार्च 2021 अखेर प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मोफत धान्य वाटप करण्यात आले होते. त्या धान्याच्या कमिशनच्या वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात गोलमाल आहे. सहकारी संस्थांच्या नावावर जमा करावयाचे कमिशन संगनमताने सेल्समनच्या नावावर जमा करण्यात आल्याची तक्रार आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाला असल्याची चर्चा आहे.
सहकारी संस्था मात्र या कमिशनपासून वंचित राहिल्या आहेत. तासगाव तालुक्यात सुमारे एक कोटी रकमेचा अपहार झाल्याची चर्चा
आहे.

सांगली जिल्ह्यात 10 कोटी 54 लाख रुपये कमीशनचे वाटप करण्यात आले आहे. याबाबत दै.पुढारी मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच आर्थिक व्यवहाराबाबत अंधारात असणार्‍या सहकारी संस्थांचे पदाधिकारी व संचालकांची धावपळ उडाली. त्यांनी तात्काळ संचालक मंडळाची बैठक बोलावून या रकमची वसुली करण्याचा निर्णय घेतला. काही सहकारी संस्थानी सेल्समनना नोटीस देऊन रक्कम तात्काळ जमा करा अन्यथा कायदेशीर कारवाई करू असा इशाराच दिला आहे.

चौकशीचे आदेश

मोफत धान्य वितरणाच्या कमिशनमध्ये झालेल्या अपहाराची जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

कारवाई कोणावर होणार?

या योजनेच्या कमिशनवर संस्थांना अंधारात ठेवून सेल्समन यांनी डल्ला मारल्याची तक्रार आहे. त्यासाठी 25 टक्के रक्कम दिल्याची जोरदार चर्चा आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संस्थांनी सेल्समनच्या मागे रक्कम जमा करण्याचा तगादा लावला आहे.अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

तहसील विभागाशी पत्रव्यवहार करणार

विकास सोसायटी सचिव संघटनेचे सचिव अर्जुन पाटील म्हणाले, सहकारी संस्थांना अंधारात ठेवून प्रशासन आणि सेल्समन यांनी केलेल्या व्यवहारामधून सहकारी संस्थांना आर्थिक फटका बसला आहे.सेल्समन संस्थेचे कर्मचारी आहेत. स्वस्त धान्य दुकान परवाना संस्थेच्या नावाने आहे. संस्थांना अंधारात ठेवून झालेल्या व्यवहाराबाबत तहसील कार्यालयाशी पत्रव्यवहार करणार आहोत.

स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार : महेश खराडे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडे म्हणाले, कोरोना काळात पुरवठा विभागाने गैरव्यवहार करून हात धुवून घेतले आहेत, हे स्पष्ट होत आहे. हा प्रकार कमिशन मिळविण्यासाठीच झाला आहे. त्यामुळे सहकारी संस्थांचे नुकसान झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. कारवाई न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल.

चौकशी करून गुन्हे दाखल करणार : जिल्हा उपनिबंधक

सहकारी संस्थांना नियमाप्रमाणे परवाने देऊन धान्यवाटप केले जाते. सेल्समन हा संस्थेचा कर्मचारी आहे. त्यामुळे कमिशन संस्थेच्या खात्यावर जमा होणे आवश्यक आहे. याबाबत स्वतंत्र लेखापरीक्षण करून जे दोषी आढळतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी सांगितले.

हेही वाचलत का?

Back to top button