Drugs : चंदगडमध्ये म्हशी, घोड्याच्या गोठ्यात ड्रग्जची शेती! | पुढारी

Drugs : चंदगडमध्ये म्हशी, घोड्याच्या गोठ्यात ड्रग्जची शेती!

चंदगड; नारायण गडकरी : वडिलांच्या वाटणीला आलेल्या आठ गुंठे जमिनीत राजकुमार राजहंस याने पत्र्याचे शेड मारले. प्रथम पोल्ट्री व्यवसाय केला. मात्र, त्यात अधिक नफा मिळत नसल्याने त्याने जवळच पशुखाद्यनिर्मितीचा कारखाना सुरू केला. घोडे, गाई, म्हशी, बकरी, कोंबड्या पाळल्या. त्यांच्या देखभालीसाठी सहा मजुरांचा दिवसभर राबता होता. रोज दोन लिटर दूध मिळविण्यासाठी सहाशे ते आठशे रुपये खर्च येत असे. पाळलेल्या घोड्याचा खर्चही न परवडणारा होता. (Drugs case)

सहा कामगारांचा महिन्याचा खर्च लाखात होता. इतका मोठा खर्च पेलतोच कसा ? असा प्रश्न ग्रामस्थांना पडायचा; पण चौकशी करायला इतका वेळही कुणाकडे नव्हता. समोर काजू कारखाना होता; पण त्यांनाही इथे काय चालते याचा थांगपत्ता नव्हता. घोडे, म्हशी केवळ लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी केलेला खोटा-नाटा प्रयोग होता. त्याने खर्‍या केलेल्या त्याच्या स्वप्नातील प्रयोगाला तीन-चार वर्षांपासून यश आले. यामधून त्याने कोट्यवधींची माया जमवली आणि मुंबई पोलिसांनी या हाय प्रोफाईल वकिलाच्या अवैध धंद्याचा पर्दाफाश केला.

भाई दाजीबा देसाई, मामासाहेब लाड, न. भु. पाटील, तानाजी वाघमारे यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा सांगणार्‍या आणि सर्पोद्यान म्हणून राज्यात नावलौकिक असणार्‍या चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी गावाला अमली पदार्थ प्रकरणावरून (Drugs case) गालबोट लागले आहे.

फक्त शेतीवरच उपजीविका चालविणार्‍या गावातील शेतकर्‍यांना याची पुसटशी कल्पना नव्हती. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी राजहंसाच्या ‘राज’कुमाराने केलेल्या या कृत्याचा अनेकांनी जाहीर निषेध नोंदविला. गावाचा अपमान सहन न झालेल्या लोकांनी बुधवार ‘काळा दिन’ म्हणून पाळला.

गेल्या चार दिवसांपासून ढोलगरवाडीत अमली पदार्थ तस्करी (Drug case) प्रकरणावरून मुंबई पोलिस तळ ठोकून होते. तब्बल चार दिवस राजकुमाराच्या या ‘उद्योगा’चा कसून तपास सुरू होता. अखेर या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून, मुख्य आरोपी राजकुमार राजहंस असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्याचे मूळ गाव ढोलगरवाडी.

लोहार कुटुंबातील वडील अर्जुन राजहंस यांनी अख्ख्या आयुष्यात प्रामाणिकपणे वकिली केली. त्यांनी एकुलत्या एक ‘राज’कुमारालाही वकील केले; पण ‘राज’ला ऐश्वर्य झटक्यात मिळवायची स्वप्ने पडू लागली. राजचे बेळगावात मन रमेना. त्याने थेट मुंबई गाठली.

हायकोर्टात वकिली करत असताना अनेक दोन नंबर धंदेवाल्यांशी संबंध आले. त्यांचा रूबाब आणि आपला रूबाब यात त्याला जमीन-अस्मानचा फरक दिसू लागला आणि त्याने दोन नंबरवाल्यांशी संधान बांधले. आता मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळण्याची तयारी केली आहे.

Back to top button