

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : (Gram Panchayat Election) राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींच्या रिक्त झालेल्या 7 हजार 130 जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये जिल्ह्यातील 139 ग्रामपंचायतींतील 194 जागांचा समावेश आहे. 21 डिसेंबर रोजी या जागांसाठी मतदान होणार आहे. चंदगड तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींच्या 57 रिक्त जागांचाही यामध्ये समावेश आहे.
22 नोव्हेंबर रोजी तहसीलदार निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करणार आहेत. 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळेत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. 7 डिसेंबर रोजी छाननी होईल.
9 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे. 21 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान होणार असून, 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर आलेल्या दावे आणि हरकतींवर निर्णय घेऊन गुरुवारी (दि.18) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. हीच मतदार यादी मतदानासाठी ग्राह्य धरली जाणार आहे.
जिल्ह्यात सुमारे 84 जागा या केवळ त्या प्रवर्गातील उमेदवार नसल्याने रिक्त आहेत. 40 जागा विद्यमान सदस्यांनी राजीनामा दिल्याने रिक्त आहेत. 43 जागा सदस्य मृत झाल्याने रिक्त झाल्या आहेत. उर्वरित जागा निवडणूक खर्चाचा हिशेब न देणे, जातपडताळणी तसेच अन्य कारणांनी अपात्र ठरविल्याने रिक्त झाल्या आहेत.
जिल्ह्यात करवीर तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या 19 जागा, आजरा तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींच्या 10 जागा, कागल तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींच्या 5 जागा, गडहिंग्लज तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींच्या 18 जागा, भुदरगडमधील 10 ग्रामपंचायतींच्या 15 जागा, गगनबावड्यातील 3 ग्रामपंचायतींच्या 4 जागा, हातकणंगलेतील 9 ग्रामपंचायतींच्या 12 जागा, पन्हाळ्यातील 10 ग्रामपंचायतींच्या 14 जागा, राधानगरीतील 14 ग्रामपंचायतींच्या 16 जागा, शाहूवाडीतील 10 ग्रामपंचायतींच्या 13 जागा, शिरोळमधील 8 ग्रामपंचायतींच्या 11 जागा, तर चंदगडमधील 35 ग्रामपंचायतींच्या 57 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.