चर्चेतील ‘त्या’ नेत्याचा होणार राजकीय प्रवेश, जानेवारीत ओबीसी विरुद्ध मराठा दंगल? : आमदार रोहित पवार | पुढारी

चर्चेतील 'त्या' नेत्याचा होणार राजकीय प्रवेश, जानेवारीत ओबीसी विरुद्ध मराठा दंगल? : आमदार रोहित पवार

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : सामाजिक प्रश्न घेऊन लढत असणाऱ्या एक नेता जानेवारी महिन्यामध्ये राजकीय प्रवेश करणार असल्याचे माहिती आमदार रोहित पवार यांनी आज (दि. ५) दिली. अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलत असताना त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर भाष्य केले.

बीड शहरामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा करण्यासाठी काही प्रोफेशनल गुंडांचा वापर केला गेला होता. पोलीस प्रशासनाने सहा ते सात तास त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. अशीच परिस्थिती येत्या जानेवारी महिन्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये केली जाईल, अशी भीती वाटते असे आमदार रोहित पवार म्हणाले.

आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता, आजच्या महाराष्ट्रात काही लोक सामाजिक क्षेत्रात लढत आहेत, ते जानेवारी महिन्यामध्ये राजकारणामध्ये येतील, असं आम्हाला वाटतं. त्यामुळे जानेवारीमध्ये ही लोकं काय भूमिका घेतात याकडे बघावं लागेल असे रोहित पवार म्हणाले. एकूणच त्यांच्या बोलण्याचा रोख मराठा आंदोलनासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडे होता.

राज्यात मराठा आंदोलनाचा मुद्दा चांगला तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाने राज्य सरकार ही हादरलं होतं. जरांगे यांनी राज्य सरकारला आरक्षणासाठी डेडलाईन दिलेली आहे. दरम्यान आता जरांगे पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अनेक ठिकाणी सभा देखील होत आहेत. यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा देखील आहेत. मात्र मनोज जरांगे यांनी आपण कधीही राजकारणात प्रवेश करणार नाही किंवा राजकारणात जाणार नाही असं म्हटलं होतं. राजकारण प्रवेशाचा त्यांनी विरोधी केला होता. मात्र आता थेट रोहित पवार यांनी नाव न घेता जरांगे पाटील जानेवारीमध्ये राजकारण प्रवेश करण्याची शक्यता वर्तवून खळबळ उडविली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जरांगे यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.

वंचितने महाविकास आघाडी सोबत यावे

लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण निर्मित केलं जात आहे. मात्र अशा वातावरण निर्मितीमुळे विभाजन होणार नाही,याची दक्षता घेणे आणि संविधान टिकवण्यासाठी भाजपला बाहेर ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित ने महाविकास आघाडीमध्ये यावे असे देखील रोहित पवार म्हणाले. मात्र सोबत येताना वंचित ने जास्त जागांची अपेक्षा बाळगू नये, त्यांचेही उमेदवार निवडून यावे, असे आम्हाला वाटते. सर्वांनी सामंजस्याने ही लढाई लढावी अशीच सर्वांची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.

Back to top button