जरांगे-पाटील यांचे कुंटुंबिय तुळजापुरात; मराठा आरक्षणासाठी देवीला साकडे | पुढारी

जरांगे-पाटील यांचे कुंटुंबिय तुळजापुरात; मराठा आरक्षणासाठी देवीला साकडे

तुळजापूर : मनोज जरांगे-पाटील यांच्या पत्नी सुमित्राताई, मुलगी तसेच बहीण भारती खराडे पाटील यांनी शुक्रवारी (दि. 3) तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेची पूजा केली. छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानी मातेने लढण्यासाठी बळ दिले आणि यश दिले. त्याप्रमाणेच मनोज दादालाही तुळजाभवानीने मराठा आरक्षणासाठी लढण्यासाठी व यश मिळविण्यासाठी बळ द्यावे, अशी प्रार्थना केली असल्याचे भारती खराडे पाटील यांनी सांगितले.

तुळजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवरायांची महाआरती करण्यात आली. छत्रपती शिवाजी चौकापासून भवानी रोड मार्गे ही रॅली तुळजाभवानी देवीच्या मंदिरासमोर आली. महिला मोर्चाच्या अग्रभागी माजी नगरसेविका मधुमती अमृतराव आणि शहरातील विद्यार्थिनी, महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या. उपस्थित शेकडो महिलांनी तुळजाभवानीची महाआरती केली. राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला देवीने सुबुद्धी द्यावी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी विनवणी या महिलांनी या आरतीनंतर तुळजाभवानी देवीसमोर केली.

Back to top button