राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या द्विपक्षीय बैठक; चीन विरोधात ठरणार रणनीती | पुढारी

राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या द्विपक्षीय बैठक; चीन विरोधात ठरणार रणनीती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जी-२० परिषदेच्या आधी भारत आणि अमेरिकेची द्विपक्षीय बैठक उद्या (८ सप्टेंबर) होणार आहे. यासाठी तर अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन उद्या (८ सप्टेंबरला) दिल्लीत दाखल होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत त्यांची बातचित होईल. दरम्यान, जी-२० परिषदेसाठी सदस्य तसेच निमंत्रित देशांच्या प्रमुखांचे कालपासून आगमन सुरू झाले असून मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींदकुमार जुगनाथ आज दिल्लीत दाखल झाले आहेत. भारतात येणाऱ्या सर्व राष्ट्रप्रमुखांच्या स्वागताची जबाबदारी केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्र्यांकडे सोपविण्यात आली आहे.

यापूर्वी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडेन सात सप्टेंबरला दिल्लीमध्ये दाखल होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन नवी दिल्लीत पोहोचल्यानंतर आयटीसी मौर्य येथे मुक्काम करणार आहेत. ते शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि शिखर परिषदेदरम्यान स्वच्छ ऊर्जा संक्रमण आणि हवामान बदलावर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी जी-२० सहभाग टाळला

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रेंच राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन, जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्झ, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा, युरोपिय महासंघाच्या अध्यक्षा उर्सूला वॉन डेर लेयेन हे देखील जी-२० परिषदेसाठी येत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर येणार नसून जी-२० बैठकीत रशियाचे प्रतिनिधित्व परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरोव्ह करणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. तर, चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनीही जी-२० मधील सहभाग टाळला आहे. पंतप्रधान लि कियांग चीनचे प्रतिनिधी असतील. चीनी शिष्टंडळाचे वास्तव्य हॉटेल ताजमध्ये असेल.

दरम्यान, जी -२० परिषदेच्या निमित्ताने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. शांग्री ला हॉटेलमध्ये त्यांचे वास्तव्य असेल. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो इंडोनेशियातील आसियान शिखर परिषदेमधील हजेरीनंतर दिल्लीत पोहोचणार असून द ललित हॉटेलमध्ये ते राहतील. तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज नवी दिल्लीत इम्पीरियल हॉटेलमध्ये वास्तव्याला राहतील.

चीनी वर्चस्वाला चाप लावण्याच्या रणनीती

या परिषदेच्या निमित्ताने आशिया खंडात विशेषतः भारताचे प्रभावक्षेत्र असलेल्या दक्षिण आशियामध्ये चीनी वर्चस्वाला चाप लावण्याच्या रणनितीवरही मंथन अपेक्षित असल्याचे सुत्रांनी सांगितले. बांगलादेश जी-२० परिषदेमध्ये विशेष निमंत्रित असून या देशात पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातही द्विपक्षीय बैठक होणार असून पारदर्शक निवडणुकांसाठी अमेरिकेकडून बांगलादेशवर आणला जाणारा दबाव भारताने रोखावा, अशी बांगलादेशची अपेक्षा आहे. अमेरिकेच्या दबावातून शेख हसिना सरकारची अस्थिरता भारताच्या हिताची नाही. यामुळे चीनला बांगलादेशात शिरकाव करण्याचीही संधी मिळू शकते, असे भारताचे म्हणणे आहे. त्यामुळे हा मुद्दा अमेरिका आणि भारताच्या चर्चेदरम्यान राहण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. अर्थात, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि बांगलादेश पंतप्रधान शेख हसिना यांचीही द्विपक्षीय बैठक यादरम्यान होणार आहे.

-हेही वाचा

कोल्हापूर : ‘बिद्री’ सहविज प्रकल्पाला राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट विशेष पुरस्कार जाहीर

सणसर कटमधून 22 गावांना पाणी मिळावे : हर्षवर्धन पाटील

पिंपरी : चोरीच्या कारणावरून मारहाण; परस्परविरोधी गुन्हे दाखल

Back to top button