नवी मुंबईला फ्लेमिंगो सिटीचा दर्जा मिळणार? | पुढारी

नवी मुंबईला फ्लेमिंगो सिटीचा दर्जा मिळणार?

नवी मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : नवी मुंबईला फ्लेमिंगो सिटीचा दर्जा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी असा दर्जा मिळावा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण आणि वन सचिवांना पर्यावरणप्रेमींच्या सूचनेवर पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

नवी मुंबईच्या जैवविविधतेचे संवर्धन करण्याच्या कामात मोठा हातभार लावलेल्या नॅटकनेक्ट फाउंडेशन या संस्थेने केलेल्या विनंतीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद देत मनीषा पाटणकर म्हैसकर, प्रमुख सचिव पर्यावरण, पी. वेणुगोपालन रेड्डी वन सचिवांना ईमेल पाठवला आहे. मुख्यमंत्र्यांनी दहा मिनिटांत दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आनंदित असून, आम्ही आता शासनाच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा करू, असे नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.

नवी मुंबई महापालिकेने एनआरआय आणि नेरुळच्या टीएस चाणक्य येथील पाणथळ जागा ताब्यात घ्यावी. राज्य कांदळवन सेलच्या मदतीने पाणथळ जागा म्हणून देखभालीसाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती नॅटकनेक्टने मुख्यमंत्र्यांना केली होती.

नवी मुंबईला फ्लेमिंगो सिटीच्या प्रस्तावावर बोलताना सेव्ह नवी मुंबई एन्व्हॉर्न्मेंटच्या सुनील अग्रवालांनी सांगितले की, शहराच्या जैवविविधतेचे संरक्षण व जतन करण्याच्या दृष्टीने आधीच पावले उचलायला हवी होती. आपल्याला अधिकाधिक हरित प्रभागांची आवश्यकता आहे. आपले नियोजित शहर आता काँक्रीटचे जंगल बनत आहे. सिडकोने गोल्फ कोर्स उभारण्याचे नियोजन केले होते.

हे प्रकरण थेट न्यायालयात गेले होते. अखेर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सिडकोला पाणथळ जागांवर गोल्फ कोर्ससाठी भराव घालण्याऐवजी त्यांची फ्लेमिंगो पक्षी उद्यानाच्या स्वरुपात देखभाल करण्याचे मार्ग शोधण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत.

राज्य कांदळवन कक्षाने ठाणे खाडी फ्लेमिंगो पक्षी अभयारण्यासाठी बीएनएचएसने प्रास्तावित केल्यानुसार उप अभयारण्य भाग म्हणून त्यांचे जतन करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Back to top button