NCP Crisis : बडव्यांमुळे आज आम्ही बाहेर पडलो, आम्ही भाजपत गेलेलो नाही : छगन भुजबळ | पुढारी

NCP Crisis : बडव्यांमुळे आज आम्ही बाहेर पडलो, आम्ही भाजपत गेलेलो नाही : छगन भुजबळ

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

शरद पवार आमचे विठ्ठल आहेत. मात्र आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरा घातला आहे. त्या बडव्यांमुळे आज आम्ही बाहेर पडलो. आम्ही भाजपत गेलेलो नाही. राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सत्तेत सहभागी झालो. ज्याप्रमाणे नागालँडमध्ये परवानगी दिली, तशी आम्हाला द्या, असे आवाहन कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा मुंबईतील एमईटी भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात पार पडला. यावेळी ते बोलत होते. गेल्या काळात अजित पवार व स्वतः पवार साहेबांनी सांगून सुद्धा सद्याच्या कारभाऱ्याकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती केल्या जात नव्हत्या. काम होत नसल्याने जबाबदारी घेण्याची तयारी अजित यांनी दाखविली, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सन २०१४ च्या अगोदर एकत्र निवडणुका लढवीत असताना २०१४ ला आपण मित्र पक्षांची साथ का सोडली ? २०१९ चा सकाळचा शपथविधी का झाला ? गुगली टाकून आपल्याच गड्याचे खच्चीकरण का ? असे सवाल उपस्थित केले. एकीकडे दिल्लीत चर्चा करायची आणि काही निर्णय घ्यायचे आणि ते निर्णय पुन्हा मागे घेतले जातात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनेक प्रलोभने समोर असताना आम्ही पवार साहेबांशी एकनिष्ठ राहिलो. आज साहेबांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. आजही आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम कायम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

ओबीसींसाठी कायम लढत राहू

भुजबळ सत्तेत सहभागी झाले आता ओबीसींच काय, असे अनेक जण आता विचारतात. तर मी त्या सर्वांना सांगू इच्छितो की, समता परिषदेचे काम राज्यात आणि देशात आपण अधिक मजबूत करणार असून ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कायम लढत राहू, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button