राजेंद्र गलांडे
बारामती(पुणे) : गेली अडीच दशके अजित पवार यांच्याकडे बारामतीचे सर्वाधिकार आणि सर्व सूत्रे देणे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना सध्या तरी चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे. आता पक्षफुटीनंतर अख्खा तालुकाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात गेला असल्याचे चित्र आहे. शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे कोणीही शिलेदार उरलेला नाही.
शरद पवार यांची बारामती ही कर्मभूमी. या बारामतीतून राजकारणाला सुरुवात केलेल्या पवार यांनी राष्ट्रीय राजकारणात आपले नाव कायम चर्चेत ठेवले. देशपातळीवर विविध पदे भूषवली. खर्या अर्थाने त्यांच्यामुळेच बारामतीचे नाव सर्वदूर पोहोचले, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, आता या कर्मभूमीतच त्यांच्याकडे ना पदाधिकारी, ना कार्यकर्ते उरले आहेत.
एकेकाळी बारामतीच्या राजकारणावर शरद पवार यांचा पूर्ण ताबा होता. त्या काळी कोणत्याही निवडणुकीत अगदी अखेरच्या क्षणी शरद पवार येतात आणि सगळी गणितं पलटतात असे बोलले जायचे. गेली अडीच दशके पवार यांनी येथील सूत्रे अजित पवार यांच्याकडे दिली. राष्ट्रीय राजकारणासह क्रिकेटमध्ये ते आंतरराष्ट्रीय नेतृत्व करू लागले. अजित पवार यांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. शहर, तालुक्यात स्वतःची फळी निर्माण केली. अजित पवार यांचा आदरयुक्त दरारा निर्माण झाला. कोणत्या संस्थेवर कोणाला संधी द्यायची याचे सर्व निर्णय अजित पवार हेच घेऊ लागले.
माळेगाव सहकारी साखर कारखाना ही एकमेव संस्था काही काळ पवार विरोधकांच्या ताब्यात राहिली. परंतु गतवेळी अजित पवार यांनी सर्व आयुधांचा वापर करत या कारखान्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. तत्पूर्वी 1992 पासूनच सोमेश्वर सहकारी साखर कारखाना त्यांनी ताब्यात घेतला होताच. जिल्हा परिषद-पंचायत समितीला एखाद्या जागेचा अपवाद वगळता सर्व जागा अजित पवार यांनी पटकावल्या होत्या. गतवेळी तर एवढीही संधी त्यांनी विरोधकांना मिळू दिली नाही. विरोधकांनाच आपलेसे करून सर्व जागा पटकावल्या.
बारामतीत अजित पवार यांची एकहाती 'पॉवर' असल्याने आजवर खासदार सुप्रिया सुळे या निर्धास्त राहिल्या. महासंसद रत्न पुरस्काराने त्यांना देशाने गौरविले. परंतु येथील कर्मभूमीत त्यांना स्वतःचा कोणताही करिष्मा दाखवता आला नाही. बारामतीत दादा म्हणेल तेच धोरण, हे सूत्र त्यांनी कायम ठेवले. परिणामी, आता फुटीनंतर त्यांच्याकडे कोणीही बिनीचा शिलेदार उरलेला नाही. भाजपने मिशन बारामती हाती घेतल्यानंतर सुळे यांनी गेले काही महिन्यांपासून गावोगावी दौरे सुरू केले होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष, साखर कारखाने, बँक अध्यक्ष यांना घेऊन त्या हे दौरे करत होत्या. वास्तविक गेली 20 वर्षे त्या राजकारणात असताना त्यांना येथे स्वतःचा कोणताही गट बांधता आला नाही. त्यांनी स्वतःची गट बांधणी केली असती, तर बारामतीत काही प्रमाणात त्यांची ताकद दिसली असती.
आमदार रोहित पवार यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात बारामती तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीतून केली. शिर्सूफळ-गुणवडी गटातून ते पुणे जिल्हा परिषदेवर गेले होते. शारदानगर शैक्षणिक संकुल, कृषी विज्ञान केंद्र, बारामती अॅग्रो ही केंद्रे रोहित पवार यांच्याकडे आहेत. सध्या शरद पवार यांच्यासोबत ते आहेत. रोहित पवार यांनी बारामतीत लक्ष घातले तरच शरद पवार यांच्या गटाला काही प्रमाणात ताकद मिळू शकेल.
हेही वाचा