दै. पुढारी इफेक्ट : वन्यजिवांची भटकंती थांबली; वनविभागाने सोडले पाणी | पुढारी

दै. पुढारी इफेक्ट : वन्यजिवांची भटकंती थांबली; वनविभागाने सोडले पाणी

नाशिक (सप्तशृंगगड) : तुषार बर्डे

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगगडावर वनविभागाने लाखो रूपये खर्चून वन्यप्राण्यांसाठी उभारलेले पाणवठे कोरडेठाक पडल्याने प्राण्यांची भटकंती याबाबतचे वृत्त दैनिक ‘पुढारी’ने प्रसिद्ध करताच त्याची दखल घेत वनविभागाने पाणवठ्यांमध्ये पाणी सोडले आहे. त्यामुळे यातून परिसरातील वन्यप्राण्यांची तहान भागली जात आहे.

सप्तशृंगगडावर मंकी पॉइंट शिवार तसेच अन्य ठिकाणी वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी वनविभागाने पाणवठे उभारले आहेत. मात्र, ऐन उन्हाळ्यात या पाणवठ्यांमध्ये पाणीच नसल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, याबाबतचे वृत्त शुक्रवारी (दि. 26) दैनिक ‘पुढारी’ने ठळकपणे प्रसिद्ध करत मुक्या जिवांच्या वेदनांकडे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत वनविभागाने येथे बांधलेल्या पाणवठ्यांमध्ये पाणी सोडले आहे. त्यामुळे या पाणवठ्यांवर माकडांसह जंगलातील अन्य प्राणी तसेच पक्षी पाणी पिताना दिसत आहेत. त्यामुळे वन्यप्रण्यांची पाण्यासाठी नागरी वस्त्याकडे होणारी धाव कमी होणार आहे.

नागरी वस्त्यांकडील धाव थांबली

मार्च, एप्रिल, मे म्हटले की, गडावर ग्रामस्थांनादेखील पाण्याच्या दुष्काळाचा सामना करावा लागतो, हीच स्थिती प्राण्यांची झाली आहे. सध्या तापमान 40 अंशांपर्यंत गेले असल्याने पाण्यासाठी प्राणी नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. मात्र, आता पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्यात आल्याने प्राण्यांची भटकंती काहीशी थांबली आहे.

हेही वाचा:

Back to top button