शिंदे गटातील २२ आमदार, ९ खासदार ठाकरेंच्या संपर्कात; ठाकरे गटाचा दावा | पुढारी

शिंदे गटातील २२ आमदार, ९ खासदार ठाकरेंच्या संपर्कात; ठाकरे गटाचा दावा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : भाजपने शिंदे गटाला नामोहरम करण्याचे प्रयत्न सुरू केल्यामुळे या गटातील वैतागलेले २२ आमदार आणि नऊ खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खा. विनायक राऊत यांनी केला आहे.

राऊत म्हणाले की, शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तीकर यांनी अलीकडेच फटाके फोडले आहेत. त्यांना दट्ट्या मिळाल्यावर ते गप्प बसतील. पण थोडे थांबा, लवकरच तिथे फटाक्याची माळच लागणार आहे. शिंदे गटात असंतोष उफाळून येतोय अनेकांनी उद्धव ठाकरे यांना संपर्क करायला सुरुवात केली आहे. यातील काही जणांसोबत प्रत्यक्ष बोलणे सुद्धा झाले आहे. त्या लोकांची नावे योग्यवेळी जाहीर करू. लवकरच बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा राऊत यांनी केला. मंत्री शंभूराज देसाई, उदय सामंत यांनी अनेकवेळा सगळे नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला. तानाजी सावंत आणि गजानन कीर्तीकर यांनी फक्त असंतोषाला वाट मोकळी करून दिली. आगीतून फुफाट्यात पडल्याची भाषा हे लोक करत आहेत. कामे होत नाहीत, तुच्छतेची वागणूक मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्याशिवाय इतर कुणालाही किंमत नाही, अशी तक्रार या आमदार आणि खासदारांची आहे, असेही विनायक राऊत म्हणाले.

‘मातोश्रीचे दरवाजे बंद करूनच सुरतला गेलो’

सातारा : पुढारी वृत्तसेवा : ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मी उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे केलेले वक्तव्य धादांत खोटे आहे. त्यामुळे राऊत यांनी दोन दिवसांत आपले म्हणणे मागे घेतले नाही तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मंत्री शंभुराज देसाई यांनी दिला. मी सुरतला गेलो तेव्हाच ‘मातोश्री’ ची दारे बंद केल्याचाही पुनरुच्चार त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

Back to top button