मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप-मनसे युती ! | पुढारी

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप-मनसे युती !

मुंबई : राजेश सावंत : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्रित येण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून अनेकदा प्रयत्न झाले. पण शेवटपर्यंत ते शक्य झाले नाही. मात्र आता शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यामुळे शिवसेना, भाजप व मनसे युतीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांचे दादर दौरे वाढलेले दिसतात.

अलीकडेच एकनाथ शिंदे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या दादरच्या घरी गेले होते. यावेळी स्नेहभोजनासह मुंबई व ठाण्यातील राजकारणावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. मुंबईतील विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्री व राज नेहमीच संपर्कात असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिव- सेना-भाजप व मनसे युतीचा प्रस्ताव शिंदे यांच्याकडूनच ठेवला जाण्याची शक्यता आहे.

शिवसेना-मनसे युती व्हावी म्हणून यापूर्वी उद्धव समर्थक अनिल देसाई आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यात अनेकदा चर्चा झाली. पण उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे राज यांनी जाहीरपणे सांगितले. आता शिवसेना उद्धव ठाकरेंकडे राहिली नसल्यामुळे शिवसेना, भाजप व मनसे युतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मुंबईत शिंदे गटापेक्षा मनसेचे सर्वाधिक मतदार आहेत. मनसेला सोबत घेऊन मुंबई महापालिका निवडणूक लढवल्यास त्याचा फायदा युतीला होऊ शकतो. शिवसेना- भाजप-मनसे युती झाल्यानंतर शिव- सेनेच्या वाट्याला येणाऱ्या प्रभागांपैकी काही प्रभाग मनसेला द्यावे लागतील. यात भाजपच्या कोट्यातीलही काही प्रभाग असतील, असे सांगण्यात येत आहे.

जागावाटपाचा फॉर्म्युला असा असेल

मुंबई महापालिका निवडणुकीत एकूण २२७ जागांपैकी भाजपाने १५० जागा लढवण्याचे जाहीर केले असले तरी, शिवसेना व मनसे सोबत युती करून निवडणूक लढवायची झाल्यास भाजप १२० ते १३० जागा लढवू शकते. शिवसेना मनसेच्या वाट्याला ९७ ते १०७ प्रभाग येऊ शकतात. उदाहरणार्थ शिवसेना- मनसेकडे १०७ प्रभाग आले, तर शिवसेना व मनसे निम्म्या निम्म्या जागा लढवू शकते.

सेना-मनसेला हे प्रभाग मिळतील

शिवसेना-मनसेमध्ये युती झाल्यास शहरातील गिरगाव, वरळी, शिवाजी पार्क, दादर, परळ, शिवडी, वडाळा, माझगाव, पश्चिम उपनगरात खार पूर्व, वांद्रे पूर्व, अंधेरी पूर्व, वेसावे, गोरेगाव, कांदिवली, दहिसर तर पूर्व उपनगरात घाटकोपर पश्चिम, भांडुप, विक्रोळी, पवई, चांदिवली या भागातील प्रभाग मिळू शकतात.

Back to top button