नाशिक : धक्कादायक! जिल्ह्यातील तब्बल २,२१४ बालकांना श्वसनाचे आजार | पुढारी

नाशिक : धक्कादायक! जिल्ह्यातील तब्बल २,२१४ बालकांना श्वसनाचे आजार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून जागरूक पालक सुदृढ बालक अभियान सुरू झाले असून, जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील मुलांची तपासणी केली जात आहे. तपासणीमध्ये धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जिल्ह्यातील ११७ बालकांना जन्मजात हृदयरोगाचे निदान झाले, तर तब्बल २ हजार २१४ बालकांना श्वसनासंबंधी आजार असल्याचे समोर आले आहे. याबाबतीत तत्काळ उपचारपद्धती राबविली जात आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, 0 ते 6 वयोगटातील अपेक्षित लाभार्थी बालकांची संख्या 1 लाख 79 हजार 301 इतकी असून, एक लाख 62 हजार 494 बालकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. तपासणी करण्यात आलेल्या बालकांमध्ये मुलींची संख्या 80 हजार 178 इतकी असून, मुलांची संख्या 82 हजार 316 इतकी आहे. वय वर्ष 6 ते 18 वयोगटातील शाळा आणि शाळाबाह्य तपासणी केलेल्या बालकांची संख्या 5 लाख 11 हजार 689 इतकी असून, त्यामध्ये मुलींची संख्या 2 लाख 50 हजार 524, तर मुलांची संख्या 2 लाख 61 हजार 165 इतकी आहे.

गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. अभियानांतर्गत राज्यातील सुमारे १८०० शाळांमधील १८ वर्षांखालील जवळपास 2 कोटी ९२ लाख मुलांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ९ हजार तपासणी पथकांमार्फत ही अभिनव योजना राबविली जात आहे. या अभियानात सहभागी होऊन प्रत्येकाने आपल्या बालकांची तपासणी करून आपण जागरूक पालक असल्याचे दाखवून द्यावे. ० ते १८ वर्षापर्यंतच्या बालकांची, किशोरवयीन मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे. आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे, गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे. (उदा. औषधोपचार, शस्त्रक्रिया इ.) प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे, सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे, राज्यातील शाळा, अंगणवाडी, शासकीय व निमशासकीय शाळा, खासगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, बालगृहे, अनाथालये, अंध, दिव्यांग शाळामधील विद्यार्थ्यांसह शाळाबाह्य विद्यार्थ्यांची तपासणी या मोहिमेअंतर्गत होत आहे. जिल्ह्यातील बालकांची रुग्णसंख्या बघता २ मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार, १३ हजार १६४ बालकांना काही ना काही आजार असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी ९ हजार ४४१ बालकांना तत्काळ उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. तर पुढील वैद्यकीय सेवेसाठी ३ हजार ४५७ बालकांना संदर्भित करण्यात आले आहे. तसेच २६७ बालकांना शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले आहे.

आजाराचे नाव                               बालकांची संख्या
इतर आजार                                   २७९५
श्वसनासंदर्भाचे आजार                      २२१४
तापसदृश आजार                            १३०१
दुभंगलेले ओठ                                 २९
डाउन सिंड्रोम                                 १०
जन्मजात बहिरेपणा                         ३७
रक्ताक्षय                                      ६९७
त्वचारोग                                      ८९२
अतिसार                                      ११९
कर्करोग                                       १४

हेही वाचा :

Back to top button