मराठीत ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून छत्रपती शिवरायांना अभिवादन (पाहा व्हिडिओ) | पुढारी

मराठीत ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून छत्रपती शिवरायांना अभिवादन (पाहा व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर करत अभिवादन केले आहे. यावेळी त्यांनी १६३० मध्ये जन्मलेले शिवाजी महाराज त्यांचे शौर्य, लष्करी प्रतिभा आणि नेतृत्वासाठी ओळखले जात असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच महाराजांचे धैर्य आणि सुशासनावर दिलेला भर प्रेरणादायी असल्याचा संदेशही त्यांनी मराठीतून आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.  तसेच शिवजयंती निमित्त अनेक राजकीय नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली आहे.

शौर्य, साहस आणि पराक्रमाचे मूर्तिमंत प्रतिरूप: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ट्विट करून अभिवादन केले आहे. त्यांनी लिहिले की, छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य, साहस आणि पराक्रमाचे मूर्तिमंत प्रतिरूप तसेच लोककल्याण आणि सुशासनासाठी पूर्णपणे कटिबद्ध असलेले लोकराज्यकर्ते होते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करून त्यांना नमन करतो.

धर्म-ध्वजाचे रक्षक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. त्यांनी ट्विट करून लिहिले, ‘हिंदवी स्वराज’चे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, रानटी मुघल आक्रमकांच्यात दहशत माजवणारे महान योद्धा, धर्म आणि ध्वजाचे रक्षक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

अदम्य धैर्य, शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक-राहुल गांधी

दुसरीकडे, राहुल गांधींनीही छत्रपती शिवाजी महाराजांना ट्विटरवरून अभिवादन केले आहे. त्यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नतमस्तक होतानाचा फोटो शेअर केला आहे. आणि ट्विट केले की, ‘अदम्य धैर्य, शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन’.

Back to top button