बहुराष्ट्रीय कंपन्यांचा चीनसोबतचा हनिमून संपुष्टात | पुढारी

बहुराष्ट्रीय कंपन्यांचा चीनसोबतचा हनिमून संपुष्टात

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोनात्तर कालावधीत बहुराष्ट्रीय कंपन्यांचे चीनबरोबरचे संबंध आता बदलले असून त्यांनी आपल्या तेथील व्यवसायाची वेगाने फेरआखणी करण्याचे धोरण स्विकारले आहे.

गेल्या ३० वर्षांत, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी वाढत्या खुल्या जगाचा लाभ घेतला. शीतयुध्दानंतर ध्रुवीय जगात तुलनेने भांडवल, व्यापार आणि कल्पनांचा मुक्त प्रवाह होता. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांना जेथून भांडवल घेता येईल, तेथून ते आपल्या निवडीनुसार घेतले.
जागतिक पुरवठा आणि जागतिक मागणी लक्षात घेऊन त्यासाठी आपल्या उद्योग व्यवसायाची व्याप्ती वाढविली आणि वाढत्या प्रमाणावर जागतिक पातळीवर ग्राहकांना सेवा दिली. आता मात्र ते शक्य होणार नाही. कारण कोरोना महामारीचे संकट, वाढता भौगोलिक- राजकीय तणाव, युद्ध, इत्यादी संकटांमुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांच्या व्यवसायांचे पुनर्मूल्यांकन, पुनर्रचना करणे आवश्यक झाले आहे. ‘द चायना इंपेरेटिव्ह फॉर मल्टिनॅशनल कंपनीज’ या मॅकेंझी अँड कंपनीच्या अहवालात हे प्रामुख्याने अध- रेखित करण्यात आले आहे. या अहवालानुसार चीन आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी गेल्या काही दशकांमध्ये परस्पर फायद्याचे संबंध निर्माण केले. १९९० ते २०१९ दरम्यान, चीनचा रिअल जीडीपी दरवर्षी सरासरी १०% ने वाढला. जागतिक जीडीपीच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त ही टक्केवारी येते.

तसेच चीनमधील सरासरी घरगुती उत्पन्न सुमारे ७५० वरून १३,००० वर पोहोचले. प्रगतीचे हे आकडे बहुराष्ट्रीय कंपन्यांना चीनकडे आकर्षित करणारे होते. वाढीचा काही वाटा आपल्या पदरात पडावा या हेतूने या कंपन्या चीनमध्ये आल्या. पण आता बदललेल्या स्थितीत बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चीनसोबतच्या त्यांच्या संबंधांचे पुनर्मूल्यांकन करण्यास सुरुवात केली आहे.

Back to top button