आम्ही तुमचे काय वाईट केले; एवढे निर्दयी कसे होऊ शकता : उद्धव ठाकरे | पुढारी

आम्ही तुमचे काय वाईट केले; एवढे निर्दयी कसे होऊ शकता : उद्धव ठाकरे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्री केसरकर गुरुवारी योगायोगाने काही क्षणासाठी एकमेकांसमोर आले. तेव्हाही या संघर्षाची चुणूक दिसली. ‘आम्ही तुमचे काय वाईट केले, तुम्ही आमच्याशी एवढे निर्दयी कसे होऊ शकता,’ या ठाकरेंच्या रोकड्या सवालावर केसरकर यांना थेट उत्तर देता आले नाही.

विधिमंडळ कामकाजाच्या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री आणि शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर हे उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्या दालनात गेले होते. आपले काम आटोपून केसरकर दालनाबाहेर जात असताना नेमक्या त्याचवेळी उद्धव ठाकरे दालनात प्रवेश करत होते. अवघ्या काही क्षणासाठी दोघे एकमेकांसमोर आले. तेवढ्यातही उद्धव ठाकरे यांनी केसरकर यांच्यावर प्रश्नाची सरबत्ती केली. तुम्हाला एवढे मोठे केले. आम्ही तुमचे काय वाईट केले आहे. तुम्ही आमच्याशी एवढे निर्दयीपणे कसे वागू शकता, असा सवाल ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे यांच्या या रोकड्या प्रश्नांना दीपक केसरकर यांना थेट उत्तर देता आले नाही. मात्र तुम्ही आमच्यावर अजूनही नाराज आहात का, इतकाच प्रतिप्रश्न करत केसरकर मार्गस्थ झाले. तर ठाकरे आणि त्यांचा ताफा उपसभापतींच्या दालनात शिरला. पण अवघ्या काही क्षणांच्या या भेटीतील प्रश्नोत्तरांची विधिमंडळ आवारात जोरदार चर्चा सुरू झाली.

Back to top button