दत्त जयंती – 2022 : भाविकांच्या अलोट गर्दीने दत्त नगरी दुमदुमली | पुढारी

दत्त जयंती – 2022 : भाविकांच्या अलोट गर्दीने दत्त नगरी दुमदुमली

क्षेत्र नृसिंहवाडी; विनोद पुजारी : दत्त जयंतीची पर्वणी साधत लाखो भाविकांनी अवघी दत्त नगरी दुमदुमली. श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये बुधवारी (दि.७) सायंकाळी पाच वाजता जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. या निमित्त दक्षिण उत्तर घाट भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. (दत्त जयंती – 2022)

पहाटे चार वाजता मंदिरात काकड आरती संपन्न झाली. सकाळपासूनच बस स्थानकापासून मुख्य दत्त मंदिर महामार्गावर भाविकांनी गर्दी केली होती. कृष्णा नदीत स्नान करून भाविक दत्त दर्शन घेताना दिसून येत होते. मंदिराच्या उत्तर बाजूस तीन ठिकाणी नीटनेटक्या रांगेचे नियोजन करण्यात आले होते. सायंकाळी पावणे पाच वाजता श्रींच्या उत्सव मूर्तीचे दत्त मंदिरात आगमन झाले. यावेळी हरी किर्तन तसेच विविध भजनाच्या तालात भाविक रंगून गेले होते. सायंकीळी पाच वाजता जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटा संपन्न झाला. यावेळी गुरुदेव दत्त च्या जयजयकारात मंदिर परिसर दुमदुमून गेला. (दत्त जयंती – 2022)

या प्रसंगी करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह भारती, छत्रपती संभाजी राजे व शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दत्त जयंती निमित्त दर्शन घेतले. शिरोळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय बोरी गिड्डे व त्यांचा सर्व स्टॉफने गर्दीवर नियंत्रण ठेवले होते. एसटी महामंडळाने ठिकठिकाणाहून ज्यादा बसेस सोडल्या होत्या. (दत्त जयंती – 2022)

कोरोनाच्या सावटामुळे गत दोन वर्षी दत्त जयंती मोठ्या जल्लोषात पार पडली नव्हती. यावर्षी मुक्त वातावरणात जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दत्त देवस्थान समितीचे अध्यक्ष सदाशिव जेरे पुजारी, चिटणीस संजय पुजारी सर्व विश्वस्त कर्मचारी, ग्रामपंचायत, सरपंच पार्वती कुंभार, उपसरपंच जाधव, ग्रामसेवक बी. एन. टोणे, सर्व कर्मचारी यांनी उत्सव सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

अधिक वाचा :

Back to top button