सौंदत्ती : "उदो गं आई उदो" च्या गजरात रेणुका देवीची यात्रा उत्साहात

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकसह महाराष्ट्र, गोवा आणि आंध्र प्रदेशमधील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची यात्रा ‘उदो ग आई उदो’ च्या गजरात, ढोल ताशांच्या निनादात, भंडार्याची उधळण करीत उत्साहात पार पडली. यात्रेचा आज (दि.७) मुख्य दिवस होता. २ लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले.
दोन वर्षाच्या खंडानंतर सोमवारी यात्रेला प्रारंभ झाला. बुधवारी पहाटे देवीची पूजा केल्यानंतर दर्शनाला प्रारंभ झाला. यल्लमाच्या डोंगरावर रात्रभर भाविक वाहने घेऊन येत होती. यामध्ये महाराष्ट्रातील भाविकांचा मोठा सहभाग होता. भाविक अर्धा ते पाऊण तास रांगेत थांबून देवीचे दर्शन घेत होते. यल्लमाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जोगणभावी येथे स्नानासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती.
बेळगाव, धारवाड, विजापूर, बागलकोट, कोल्हापूर, सांगली आदी जिल्ह्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावर्षी पहिल्यादांच डोंगरावरील सर्व मंदिराच्या आजुबाजुचे अतिक्रमण दूर केल्याने भक्तांना दर्शन करणे सुलभ झाले.
आज पहाटे देवीची पूजा झाल्यानंतर दर्शनाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर भक्तांची मोठी रांग लागली. गेल्या दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत यंदा भक्तांची गर्दी कमी दिसून आली. तरीही आज दुपारपर्यंत सुमारे २ लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतल्याची माहिती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बसवराज जिरग्याल यांनी दिली. पार्किंगची व्यवस्था नेटनेटकी केल्याने वाहतूक कोंडी झाली नाही. महाराष्ट्रातून जवळपास भाविकांच्या ३०० बस डोंगरावर दाखल झाल्या आहेत.
हेही वाचा :
- सीमाप्रश्नावरून संसदेत प्रचंड गदारोळ, खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप खासदारामध्ये वाक् युद्ध
- MNS Raj Thackeray : कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसतंय; केंद्राने लक्ष घालावं – राज ठाकरे
- Tweet Sanjay Raut : मंत्री महोदय ही सरळ सरळ धमकी समजायची काय? राऊतांचा शंभूराज देसाईंना सवाल