T20 World Cup : सूर्याच्या दाहकतेमागचे विज्ञान | पुढारी

T20 World Cup : सूर्याच्या दाहकतेमागचे विज्ञान

विश्वचषकातील (T20 World Cup) उपांत्य फेरीच्या टप्प्यावर आपण आलो आहोत. भारतीय फलंदाजीत कोहली आणि सूर्यकुमार यादव हेच काय ते सातत्य दाखवत आहेत. यात कोहलीच्या फॉर्मला लागलेली द़ृष्ट दूर झाली, हा झाला त्याच्या महानतेचा भाग, पण सर्वात जास्त बोलबाला होत आहे तो सूर्यकुमार यादवचा. प्रत्येक सामन्यात त्याची बहरत चाललेली फटकेबाजी, फटक्यात असलेली विविधता त्याच्याकडे आली तरी कुठून?

त्याने मुलाखतीत सांगितले की, तो गोलंदाज चेंडू कसा टाकेल, याचा अंदाज घेऊन तीन फटके तयार ठेवतो. हे सर्व सांगायला सोपे वाटते, पण ऑस्ट्रेलियातल्या वेगवान खेळपट्ट्यांवर हे फटके खेळायला काही मिलिसेकंदांचा अवधी असतो.

बरं हे अप्पर कट, विकेटकिपरच्या डोक्यावरून षटकार मारणे किंवा स्कूप हे फटके महत्त्वाच्या सामन्यात खेळताना जरा जरी चूक होऊन बाद झाला असता तर त्याची कारकीर्द धोक्यात आली असती. तेव्हा हे फटके तो काही त्या क्षणाला सुचतील असे तो नक्कीच खेळत नाही, तर त्यामागे आहेत ते कठोर परिश्रम. तो मुलाखतीत जे बोलला तो होता फक्त पडद्यावरचा चित्रपट. पण या चित्रपटामागची कथा शोधायचा प्रयत्न केला तर ज्येष्ठ क्रीडासमिक्षक डॉ. मकरंद वायंगणकर यांच्या एका ट्विटने रहस्य उलगडले. अजून खोलात जाऊन माहिती काढली आणि या सूर्याच्या मुक्तछंदातील फलंदाजीच्या तयारीचा उलगडा झाला.

आजकाल कसोटीपटू सोडाच, रणजीपटूही एकदा पुढचा टप्पा गाठला की मागे वळून क्लब क्रिकेटकडे बघत नाहीत. परदेश दौर्‍यावरून परतल्यावर विमानतळावरून थेट कांगा लीग खेळायला जाणारा सुनील गावसकरचा जमाना आता संपला आहे, असे वाटतानाच एक खेळाडू आवर्जून त्याच्या पारशी जिमखान्याशी नाते टिकवून आहे तो म्हणजे सूर्यकुमार यादव.

भारतासाठी खेळूनही त्याच्या क्लबसाठी तो सदैव तयार असतो. तब्ब्ल 137 वर्षांपूर्वी म्हणजे 1885 साली स्थापन झालेल्या या जिमखान्याने फारुख इंजिनिअर, नरी कॉन्ट्रॅक्टर, पॉली उम्रीगरसारखे पारशी खेळाडू भारताला दिलेच, पण या जिमखान्याने त्यांचा सध्याचा सदस्य सूर्यकुमार यादव याच्या विश्वचषकाच्या तयारीलाही विशेष हातभार लावला.

विश्वचषकाच्या त्याच्या स्वतःच्या तयारीचा भाग म्हणून त्याने जिमखान्याच्या पदाधिकार्‍यांना सांगून तिथे ऑस्ट्रेलियात असतात तशी हिरवीगार खेळपट्टी बनवून घेतली. कारण मुंबईतल्या कुठच्याही पाटा खेळपट्ट्यांवर खेळपट्टीच्या वेगाचा अंदाज घेणे शक्य नव्हते. मुंबईचा माजी सलामीवीर विनायक माने सध्या या जिमखान्याचा प्रशिक्षक आहे. त्याच्या साहाय्याने विविध प्रकारचे गोलंदाज त्यांनी सरावाला आणले. चार तासांच्या सरावात सूर्या आणि विनायक माने सामन्यात होऊ शकणार्‍या विविध परिस्थितीची तालीम करायचे आणि सूर्या त्याप्रमाणे फटके शोधायचा आणि त्याचा सराव करायचा. उदाहरणार्थ एक षटकात 18 धावा हव्या आहेत, समोर डावखुरा जलदगती गोलंदाज आहे आणि क्षेत्ररक्षण काय लावले असेल? समोरच्या साथीदाराकडून काय अपेक्षा ठेवाव्यात इत्यादी.

एक प्रशिक्षक म्हणून विनायक माने ज्या सूचना करायचा, त्याही आपले स्टार वलय बाजूला ठेवून सूर्या ऐकायचा आणि त्या फटक्यांचा घोटून सराव करायचा. आज सूर्या जो बेफाट सुटलेला दिसतो तो निव्वळ मोकाटपणा नाही आहे तर त्यामागे एक प्रक्रिया आहे. मरिन ड्राईव्हच्या पारशी जिमखान्याची समुद्राच्या बाजूची सीमारेषा चांगली 75 मीटरच्या आसपास आहे. वानखेडेपेक्षा ही जास्त आहे. इथे षटकार मारल्याचा सराव केल्याने सूर्याचे फटके ऑस्ट्रेलियात प्रेक्षकात पोहोचत आहेत.

कुठच्याही खेळाडूला मोठे होण्यासाठी किंवा संघाचा मॅचविनर होण्यासाठी त्याच्यात इतरांपेक्षा काही खास गुण असावे लागतात. कधी हे गुण उपजत असतात, तर कधी सरावाने आत्मसात केले जातात. 1987 च्या विश्वचषकाची उपांत्य (T20 World Cup) फेरीची लढत आपण वानखेडेवर इंग्लंडकडून हरलो. फिरकीला साथ देणार्‍या खेळपट्ट्यांवर आपले फिरकी गोलंदाज रवी शास्त्री आणि मनिंदर सिंग इंग्लंडला भारी पडतील, असे सहज वाटले होते; पण ग्रॅहम गूच ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामन्याच्या आधी 3 दिवस सरावासाठी दिलेल्या स्थानिक फिरकी गोलंदाजांविरुद्ध फक्त स्वीपचा सराव करत होता. उपांत्य सामन्यात निव्वळ स्वीपच्या जोरावर गूचने आपली फिरकी निष्प्रभ ठरवत शतक केले आणि सामना इंग्लंडला जिंकून दिला.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना नेहमीचा सराव तर लागतोच, पण जो खेळाडू परिस्थितीचा अंदाज घेऊन सराव करतो तो वेगळा ठरतो. याचमुळे सूर्या आज 360 डिग्रीतला फलंदाज आहे का नाही, यावर अनेक मते असतील, पण या विश्वचषकात तो वेगळा मात्र ठरला आहे. या विश्वचषकातील पुढच्या वाटचालीत भारताच्या विजयासाठी सूर्याची प्रतिस्पर्ध्यांसाठी ठरत चाललेली दाहकता अशीच वाढू दे!

निमिष पाटगावकर 

Back to top button