Zarkhand : अबब! विद्यार्थ्यांनी चक्क शिक्षकांना झाडाला बांधून बेदम मारहाण! व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या कारण | पुढारी

Zarkhand : अबब! विद्यार्थ्यांनी चक्क शिक्षकांना झाडाला बांधून बेदम मारहाण! व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या कारण

पुढारी ऑनलाइन डेस्क : झारखंडच्या दुमका येथील एका गावातील शालेय विद्यार्थ्यांनी परीक्षेत कमी गुण दिल्याबद्दल चक्क त्यांच्या शिक्षकांना झाडाला बांधले आणि त्यांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. शिक्षक सुमन कुमार, आणि लिपिक सोनराम चौरे अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुख्याध्यापक आणि 11 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परीक्षेत शिक्षकांना प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण दिलेच नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या निकालावर परीणाम झाला. यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ठरवून शिक्षकांना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना झाडाला बांधून गुण का दिले नाही म्हणून जाब विचारला आणि नंतर मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र वायरल झालेला.

याबाबत, ”आम्हाला घटनेची माहिती मिळाली आणि सर्व शिक्षकांशी चर्चा केली. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांना प्रॅक्टिकलमध्ये खूप कमी गुण मिळाले आहेत आणि त्यांना त्यांच्या शिक्षकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही.”
– सुरेंद्र हेब्रम, ब्लॉक शिक्षण विस्तार अधिकारी, गोपीकंदर, दुमका

”विद्यार्थ्यांनी आम्हाला मीटिंगच्या बहाण्याने बोलावले आणि त्यांचे निकाल खराब झाल्याचे सांगितले. त्यांचे प्रात्यक्षिक गुण निकालात समाविष्ट न केल्यामुळे, असे घडले. ते मुख्याध्यापकांनी करायचे होते. त्यामुळे आम्ही याबाबत कोणतेही पाऊल उचलू शकलो नाही.”
– कुमार सुमन, शिक्षक

शिक्षक सुमन कुमार आणि लिपिक सोनराम चौरे यांनी मुख्याध्यापकाच्या सांगण्यावरून त्यांना मारहाण करून झाडाला बांधल्याची तक्रार केली. मुख्याध्यापक आणि 11 विद्यार्थ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

– नित्यानंद भोक्ता, गोपीकंदर पीएस प्रभारी, दुमका

Back to top button