नारायणगाव : अष्टविनायकातील श्री क्षेत्र ओझर येथे द्वारयात्रेला सुरुवात | पुढारी

नारायणगाव : अष्टविनायकातील श्री क्षेत्र ओझर येथे द्वारयात्रेला सुरुवात

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा: भाद्रपद चतुर्थीनिमित्त अष्टविनायकातील श्रीक्षेत्र ओझर येथे अत्यंत महत्त्वाच्या द्वारयात्रेला सुरुवात झाली आहे. उंब्रज येथील पहिलाद्वार मंगलमय वातावरणात पार पडला. गणेशजयंती उत्सवाला गणपती उंब्रज, धनेगाव, शिरोली खुर्द व ओझर येथील आंबेराई येथे असणाऱ्या मंदिरामधील देवींना आपल्या बहिणींना गणेश जन्मानिमित्त निमंत्रित करण्यासाठी पालखीत जातात. या द्वारयात्रेला शेकडो वर्षांची परंपरा असून, द्वार यात्रा मार्गावर पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी होती.

महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट उंब्रज, मुक्तीधाम देवस्थान ट्रस्ट, सहकार सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ, स्वामी समर्थ देवालय ट्रस्ट व व्यक्तिगतरीत्या अनेक भाविक भक्तांनी द्वार यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना खिचडी, केळी, वेफर्स शुद्ध पाणी व प्रसादाचे वाटप केले. भाविक श्रींच्या पालखीसोबत अनवाणी चालतात हे द्वार यात्रेचे वैशिष्टे आहे. पहिला द्वार उंब्रज येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये लक्ष्मी-नारायण पूजा करून पार पडला. देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे व उपाध्यक्ष अजित कवडे, सचिव दशरथ मांडे, खजिनदार कैलास घेगडे विश्वस्त बी.व्ही.मांडे आनंदराव मांडे, रंगनाथ रवळे, किशोर कवडे, मंगेश मांडे, गणपत कवडे, कैलास मांडे, मिलिंद कवडे, विजय घेगडे, श्रीराम पंडित, राजश्रीताई कवडे यांचा उंब्रज ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

ओझर येथून श्रींची पालखी टाळ मृदुंगांच्या गजरात गणरायाच्या नामघोषात येडगाव धरणाच्या जलाशयातून होडीतून उंब्रज येथे जाऊन गणराय आपल्या बहिणीला निमंत्रित करून आले. येडगाव जलाशयाजवळ ओतूर पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे व पोलीस कर्मचारी यांचा पोलीस बंदोबस्त असल्यामुळे द्वार यात्रा निर्विघ्न पणे पार पडली. ओझर आणि पंचक्रोशीतील सुमारे तीन ते साडेतीन हजारांपेक्षा अधिक भाविक या द्वार यात्रेत सहभागी झाले होते . पहिल्या दिवशीची द्वार यात्रा मोठ्या आनंदात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाली.

Back to top button